अंगणवाडी सेविकांद्वारे चालणारे काम पेपरलेस व जलद गतीने करण्यासाठी शासनाच्या वतीने अंगणवाडी ताई, मदतनीस यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना टॅब, मोबाईलचे वाटप करण्यात आले आहे. मासिक रिचार्जसह इतर सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. शिवाय मोबाईल हाताळणे आणि माहिती कशा प्रकारे अपलोड करायची? याचे विशेष प्रशिक्षणही सर्वांना देण्यात आले आहे. प्रारंभीच्या काळात येणाऱ्या इतर अडचणीही महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सोडविण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत अंगणवाडी सेविकांना मोबाईल हाताळताना सर्वाधिक अडचण ही इंटरनेट कनेक्टिव्हिटीची येत असल्याचे दिसून येत आहे.
अडचणी काय !
अंगणवाडी सेविकांना मोबाईवरून संपूर्ण माहिती अपलोड करावी लागते. ग्रामीण भागात सर्वधिक मोठी अडचण मोबाईलच्या रेंजची आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीची आहे. दुसरीकडे काही मोजक्या मोबाईलला तांत्रिक अडचणी येतात. त्या अडचणी सोडविण्यासाठी एका डिलरची नियुक्ती केली आहे.
अंगणवाडी सेविकांची कामे सोयीस्कर झाली
अंगणवाडी सेविकांसह इतरांना मोबाईल, टॅबचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे रजिस्टर भरण्याचे काम कमी झाले असून, मोबाईलवर सोयीस्करित्या कामे होत आहेत. त्यांना येणाऱ्या अडचणीही सोडविल्या जातात.
- एस. डी. लोंढे
महिला, बालकल्याण अधिकारी
मोबाईलवरुन कोणती सरकारी कामे करावी लागतात?
अंगणवाडीतून बालकांना पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराची माहिती ऑनलाईन पध्दतीने भरण्याचे काम अंगणवाडी सेविकांना करावे लागते.
अंगणवाडीत असलेल्या बालकांच्या लसीकरणाची माहिती भरणे. बालकांची उंची, वजनाची माहिती वेळोवेळी भरणे.
स्तनदा माता, गरोदर मातांसह मुलींच्या नोंदी करणे, त्यांच्यासाठी राबिवलेल्या योजना, लसीकरणाची माहिती ऑनलाईनद्वारे भरणे.
प्रशासकीय स्तरावरून दिलेले उद्दिष्ट, सांगितलेली दैनंदिन कामे यांचा कार्य अहवाल ऑनलाईन पध्दतीने माहिती अपलोड करणे.
शासनाच्या विविध योजनेद्वारे गृहभेटी देऊन माहितीचे संकलन केले जाते. संकलित केलेली माहितीही ऑनलाईन पध्दतीने भरावी लागते.
शासनस्तरावरून अंगणवाडीतील बालकांसह स्तनदा मातांसाठी, गरोदर मातांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती भरणे.