बगदाद : अमेरिकेने इस्लामिक स्टेट अर्थात इसिसविरुद्धच्या आपल्या मोहिमेची व्याप्ती वाढवत दहशतवाद्यांवर इराकची राजधानी बगदादजवळ बॉम्बहल्ले केले. अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी बगदादजवळ बॉम्बहल्ले करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दुसरीकडे निगराणी गटाने म्हटले आहे की, आपल्यात ताकद वाढल्याचे संकेत देताना इसिसचे दहशतवादी सिरियाचे लढाऊ विमान पाडण्यात यशस्वी झाले आहेत. हे विमान इसिसचा उत्तर-मध्य सिरियातील बालेकिल्ला असलेल्या राक्वा शहरावर हल्ले करत होते.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात इसिसच्या नायनाटासाठी अथक युद्धाची घोषणा केल्यानंतर काही दिवसांतच अमेरिकी लष्कराने इसिसविरोधी मोहिमेची व्याप्ती वाढवली. अमेरिकी लढाऊ विमानांनी बगदादपासून 25 किमीवर असलेल्या सद्र अल-युसूफिया भागात इसिसच्या दहशतवाद्यांवर हल्ले केले.
अमेरिकी लष्कराने दहशतवाद्यांवरील हल्ले इराकमध्ये सुरूच ठेवले असून लढाऊ विमानांनी रविवारी आणि सोमवारी सिंजार तद्वतच बगदादच्या नैऋत्य भागात हल्ले केले.(वृत्तसंस्था)