बैरूत : सिरियाच्या पूर्व शहरात देर अल-जार येथे परिस्थिती बिकट आहे. हे शहर एक वर्षापासून कट्टरवाद्यांच्या ताब्यात असून येथील लोक आता भुकेपोटी जवळचे सोने विकत असल्याचे भयंकर वास्तव समोर येत आहे. सरकारी सैनिक आणि इसिसच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी हे लोक घरदारही विकत आहेत. एकीकडे इसिसचे अतिरेकी तर दुसरीकडून सरकारी सैनिक, एकूणच काय तर संघर्षाच्या या भयानक दुष्टचक्रात अडकलेल्या लोकांना भूक भागविण्यासाठी जवळचे आहे नाही ते विकायची वेळ आली आहे. अगदी घर दार विकून हे लोक आता भूक भागविण्याचा प्रयत्न करत आहेत. सिरियातील या शहरात खाण्यापिण्याची एवढी टंचाई निर्माण झाली आहे की, अन्न मिळणे मुश्कील झाले आहे. एकेकाळी तेलामुळे समृद्ध असलेला हा देश अंतर्गत युद्धामुळे पूर्णत: उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. जिथे कधी काळी भरभराट होती तिथे आज एक कप चहा मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे ब्रेड आणि पाण्यावर दिवसाची भूक भागवावी लागत आहे. अर्थात तेही सहजासहजी मिळत नाही. नळाला तर कित्येक दिवस पाणीच येत नाही आणि जेव्हा पाणी येते तेही खारे असते. दहा महिन्यांपासून या शहरात वीज नाही. संयुक्त राष्ट्र संघाने गेल्या आठवड्यातच इशारा दिला होता की, देर अल जारमध्ये परिस्थिती अतिशय बिकट आहे. कुपोषणामुळे विद्यार्थी शाळेत येत नाहीत. एकमेव सरकारी दवाखान्यात औषधे आणि अन्य कर्मचाऱ्यांची गरज आहे. संयुक्त राष्ट्र संघाने आपल्या अहवालात कुपोषणामुळे झालेल्या २० मृत्यूंचा उल्लेख केला आहे. तर देर अल -जारमधील जस्टिस फॉर लाइव्ह आॅब्जर्व्हेटरीचे प्रवक्ते अली अल- राहबी यांनी सांगितले की, आतापर्यंत अशा २७ मृत्यूंची नोंद झालेली आहे. (वृत्तसंस्था)
भूक भागविण्यासाठी सोने विकण्याची वेळ
By admin | Updated: January 21, 2016 03:17 IST