वॉशिंग्टन : पृथ्वीवर दिवसात एकदाच सूर्योदय व सूर्यास्त होतो; परंतु शास्त्रज्ञांनी शोधलेल्या नव्या ग्रहावर दिवसात तीन वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त होतो. आहे ना कमाल? या ग्रहाला तीन सूर्य असल्यामुळे हा चमत्कार घडतो. इतर कोणालाही न पाहता आलेली निसर्गाची ही अद्भुत किमया पाहून आम्ही थक्क झालो, असे शास्त्रज्ञ केविन वाग्नेर यांनी सांगितले. आम्ही शोध घेत जसजसे पुढे जात आहोत तसतसे मती गुंग करणाऱ्या अनेक गोष्टी आमच्या दृष्टीपथास येत आहेत. आमच्यासाठी निसर्गाकडे अशी आणखीही अनेक आश्चर्ये असावीत असे मला वाटते, असेही ते म्हणाले. केविन आणि त्यांच्या पथकाने या अनोख्या ग्रहाचा शोध लावला. या ग्रहाचे वस्तुमान गुरू ग्रहाच्या वस्तुमानाहून चौपट आहे. हा ग्रह पृथ्वीपासून ३४० प्रकाशवर्ष दूर असून, तेथे वर्षाच्या एका विशिष्ट काळात तिन्ही सूर्य आकाशात दिसून येतात. त्यामुळे तीन वेळा सकाळ आणि तीन वेळा रात्र होते. तीन सूर्यांपैकी प्रमुख सूर्य मोठा असून उर्वरित दोन लहान आहेत. या ग्रहाच्या एक वर्षाच्या एक चतुर्थांश एवढा काळ (पृथ्वीवरील १०० ते १४० दिवस) येथे सतत दिवस असतो. कारण मोठा सूर्य तळपत असतो आणि छोटे सूर्य मावळत असतात. या तरुण ग्रहाचे वजन १.६ कोटी वर्ष असल्याचे मानले जाते.
एका दिवसात तीन वेळा होतो सूर्योदय
By admin | Updated: June 19, 2017 01:13 IST