बीजिंग : तिबेटची राजधानी असलेल्या ल्हासामधील पोटला पॅलेसचे नूतनीकरण करण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे. त्यासाठी १0 दशलक्ष युआन (१५ दशलक्ष डॉलर्स) इतका खर्च येणार आहे. चारही बाजूने हिमालयाची पर्वतराजी आणि मध्यभागी हा पॅलेस असे दृश्य खूपच मनोहारी आहे.हा पॅलेस बांधण्यास ४५ वर्षे लागली आणि १६९४ साली तो बांधून पूर्ण झाला. भूकंपाचा परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने याची बांधणी झाली आहे. या पॅलेसच्या काही भागाला देण्यात आलेला सोन्याचा मुलामा खराब झाला आहे. त्यामुळे नूतनीकरणात तेही काम केले जाणार आहे. हा पॅलेस बांधण्यापूर्वीही याच जागी दलाई लामांचे वास्तव्य असायचे.चीनच्या आक्रमणानंतर १९५९मध्ये दलाई लामा तेनझिन ग्यात्सो भारतात आले. त्यांच्यासह अनेक तिबेटी लोकांनीही भारतात येऊन हिमाचल प्रदेशातील धर्मस्थळ येथे वास्तव्य केले.चीनच्या आक्रमणाला तिबेटी लोकांनी विरोध केला, तेव्हा या वास्तूचे काहीसे नुकसान झाले होते.या १३ मजली पॅलेसमध्ये १ हजार खोल्या, १0 हजार मंदिरे आणि दोन लाख मूर्ती आहेत. चीन सरकारने १९६४ साली या पॅलेसचे रूपांतर म्युझियममध्ये केले. देशी व परदेशी पर्यटकांचे हे आकर्षणाचे ठिकाण आहे. गेल्या वर्षी तिथे १0 लाख ३७ हजार पर्यटक आले होते. पण आता रोज १६00 पर्यटकांनाच आत जाण्यास परवानगी दिली जाते.
पोटला पॅलेसचे होणार नूतनीकरण, १५ दशलक्ष डॉलर्स खच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 04:51 IST