जपान या देशाविषयी भारतीयांना खूप आकर्षण आहे. पण माहिती फारशी नाही. ‘लव इन टोकियो’ या चित्रपटामुळे अनेकांना जपानविषयी थोडंफार कळलं. जपानी बाहुल्याही प्रसिद्ध. त्यामुळे गाण्यांमध्येही ‘ले गयी दिल, गुडिया जापान की’ यापासून, ‘मुझे तो गुडिया जापानी लगती है’ अशा अनेक गाण्यांत ही बाहुली डोकावते. अमेरिकेने जपानवर टाकलेला अणुबॉम्ब आपल्याला माहीत आहे आणि त्यानंतर राखेतून फिनिक्स पक्षी पुन्हा जशी भरारी घेतो, तशी जपाननेही सर्व क्षेत्रांत घेतली, हेही आपल्याला शिकवलं आहे.असा हा देश तब्बल ६८५२ बेटांमध्ये विभागला गेला आहे. त्यापैकी अनेक बेटं तर जेमतेम एक किलोमीटर आकाराची आहेत. त्यापैकी एका बेटावर सुमारे १00 लोक राहतात आणि तिथं मांजरांची संख्या आहे ४00. तिथं कुत्र्यांना नेण्यास बंदी आहे. जपानचा ९७ टक्के भाग हा चार बेटांत सामावला आहे. म्हणजे ६८४९ बेटांनी केवळ ३ टक्के भूभागच व्यापला आहे. या देशात साक्षरता आहे १00 टक्के. तिथं एकही जण निरक्षर नाही. देशातील पुरुषांचं सरासरी आयुर्मान ८१ तर महिलांचं आयुर्मान ८८ आहे. त्यामुळे देशात वृद्धांची संख्याच अधिक झाली आहे आणि तो देशासाठी चिंतेचा विषय आहे. जपान ही देशातील तिस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारत आहे चौथ्या क्रमांकावर.जपानमध्ये ज्वालामुखी असून, त्याचे सतत लहान-मोठे स्फोट होत असतात. इतकंच नव्हे, तर जगात सर्वाधिक भूकंप जपानमध्येच होतात. सरासरी दिवसाला तीन भूकंप. त्यामुळे जपानी लोकांना भूकंपाची सवयच झाली आहे. त्यांनी भूकंप गृहीत धरूनच घरं बांधली आहेत. भूकंपात न कोसळणारी. सर्वांत मोठा भूकंप ११ मार्च २0११ रोजी झाला. त्याची तीव्रता होती ९.१. त्यात हजारो लोक मरण पावले. जपान या धक्क्यातूनही लगेच सावरला. तिथं गुन्ह्यांचं आणि त्यातही हत्यांचं प्रमाण खूपच कमी आहे. जपानी मुलं वयाच्या १0व्या वर्षी शाळेत जाऊ लागतात. आपल्यासारखं तिसºया वर्षीच मुलांना शाळेत घालायची त्यांना गरज भासत नाही. जपानच्या वृत्तपत्रांत राजकारण, गुन्हे, चित्रपट कलावंतांची प्रेमप्रकरणं यावर अजिबात भर नसतो. जपानी लोकांना कॉमिक वाचायला खूप आवडतात. तेथील लोक वेळेच्या बाबतीत अतिशय शिस्तशीर असतात. तिथं रेल्वेही १८ सेकंदांपेक्षा अधिक विलंबानं धावत नाहीत. चारच दिवसांपूर्वी एक ट्रेन एका स्टेशनहून २0 सेकंद लवकर निघाली. त्याबद्दल एकाही प्रवाशानं तक्रार केली नाही. तरीही या चुकीबद्दल रेल्वे कंपनीने सर्व प्रवाशांची जाहीर माफी मागितली होती. आपल्याकडे तासन्तास गाड्या उशिरा धावतात. पण अशी दिलगिरी मागितल्याचं कोणाला आठवतंय?
अद्भुत जपानविषयी थोडंफार, एकाच बेटावर राहतात 100 लोक आणि 400 मांजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 04:01 IST