इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी १९९९ मध्ये कारगिल कटाबाबत पंतप्रधान नवाज शरीफ व जनरल अशफाक परवेझ कयानी यांना अंधारात ठेवले होते, असा दावा ‘हम भी वहाँ मौजूद थे’ या नव्या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. माजी मंत्री व माजी लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) अब्दुल मजीद मलिक यांनी हे पुस्तक लिहिले आहे. पाकिस्तान लष्कराने १९९९ मध्ये कारगिल भागामध्ये सैन्य घुसवल्याने भारत व पाकमध्ये अणुयुद्धाचा भडका उडण्याची स्थिती ओढवली होती. तेव्हा कयानी पाकव्याप्त काश्मीरच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या ‘१२ व्या डिव्हिजन’चे प्रमुख होते. मात्र, कारगिलमध्ये सैन्य घुसविण्याबाबत मुशर्रफ यांनी त्यांना विश्वासात घेतले नव्हते, असे या पुस्तकात म्हटले आहे. २००७ मध्ये मुशर्रफ यांनीच कयानी यांना पाकचे लष्करप्रमुख केले होते हे उल्लेखनीय. कयानी किंवा मुशर्रफ यांनी या पुस्तकावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कयानी यांच्यासह पंतप्रधान शरीफ यांनाही याची माहिती नव्हती. संपूर्ण कारगिल घटनाक्रमासाठी एकटे मुशर्रफच जबाबदार आहेत, असेही या पुस्तकात म्हटले आहे. कारगिलबाबत मुशर्रफ यांनी आपल्याला अंधारात ठेवले होते, असे शरीफ यांनी अनेकदा म्हटले आहे तर मुशर्रफ यांना त्यांचे हे म्हणणे मान्य नाही. ‘कारगिल आॅपरेशन’ची माहिती शरीफ यांना वेळोवेळी देण्यात येत होती, असे मुशर्रफ म्हणतात. (वृत्तसंस्था)४मुशर्रफ यांनी कारगिलबाबत चर्चेसाठी पाकच्या लष्करी अधिकाऱ्याला दूरध्वनी केला होता. तेव्हा भारतीय गुप्तचर संघटनांनी त्यांचे संभाषण पकडले होते, असा दावाही मलिक यांच्या या पुस्तकात करण्यात आलेला आहे.
कारगिल कट जनरल मुशर्रफ यांचाच
By admin | Updated: March 5, 2015 23:44 IST