वॉशिंग्टन : हवामान बदलामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई विकासावर परिणाम करून मानवी स्थलांतराला भाग पाडू शकते व भारतासह जगभर संघर्ष होऊ शकतो, असा इशारा जागतिक बँकेने दिला आहे. सध्या भारतात अनेक ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई आहे. जागतिक बँकेच्या ‘हाय अँड ड्राय : क्लायमेट चेंज, वॉटर अँड इकॉनॉमी’ या नावाचा हा अहवाल मंगळवारी प्रसिद्धीस देण्यात आला. त्यात म्हटले आहे की, वाढती लोकसंख्या, वाढते उत्पन्न आणि विस्तारणाऱ्या शहरांत पाण्याची मागणी प्रचंड वेगाने वाढत असून, ती अधिकच वाढणार आहे. त्या तुलनेत पुरवठा अनियमित व खात्रीचा नाही. जगातच पाणीटंचाई ही आर्थिक स्थैर्य आणि विकासाला बाधक ठरली आहे व त्यात हवामान बदलाने भयंकर भर घातली आहे, असे जागतिक बँकेचे जिम योंग किम यांनी म्हटले. फार मोठ्या लोकसंख्येचे जे देश जलस्रोतांचे चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करणार नाहीत तेथील लोक प्रदीर्घ काळपर्यंत नकारात्मक आर्थिक परिस्थितीत राहतील, असे जिम किम यांनी म्हटले.भारतात पाण्याच्या बचतीची गरज भारतात पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व कार्यक्षमरीत्या करण्याची गरज असल्याचेही जागतिक बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. भारतात पाण्याची मागणी वाढत असून पाणीटंचाईही वाढती आहे. गुजरातेत भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली आहे. यापुढे गुजरातमधून पाणी मिळविणे खूप खर्चिक झाले आहे. तेथील शेतकरी पीक पद्धतीत बदल करणे किंवा सिंचनासाठी तंत्रज्ञानाचा अधिक कार्यक्षम उपयोग करण्याऐवजी शहरांत स्थलांतर करीत आहेत, असे जागतिक बॅँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
पाणीटंचाईमुळे मानवी स्थलांतराचा मोठा धोका
By admin | Updated: May 5, 2016 03:09 IST