वॉशिंग्टन : अमेरिकेच्या नेतृत्वाखाली सिरिया व इराकमधील इसिसच्या ठाण्यावर केल्या जाणाऱ्या हल्ल्यामुळे संतप्त बनलेल्या इसिस जिहादींनी अमेरिकन लष्कराच्या टिष्ट्वटर व यू ट्यूब वेबसाईट हॅक केल्या असून, त्यावर इसिसच्या समर्थनार्थ मजकूर टाकण्यात आला आहे. इसिसने या हल्ल्याला सायबर जिहाद असे नाव दिले आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेने लगेचच पावले उचलली असून, अमेरिकन लष्कर या हल्ल्याद्वारा कोणतीही महत्त्वाची माहिती बाहेर पडू नये याची खबरदारी घेत आहे. यामुळे कोणतीही माहिती लीक झालेली नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी प्रवक्ते जोश अर्नेस्ट यासंदर्भात बोलताना म्हणाले की किती माहिती चोरली गेली यावर आमचे लक्ष आहे, महत्त्वाची माहिती बाहेर पडू नये याची खबरदारी घेतली जात आहे. वेबसाईटवर हल्ला होणे आणि मोठ्या प्रमाणावर मजकूर हॅक केला जाणे यात फरक असतो. या हल्ल्याची तुलना सोनीवरील हल्ल्याशी केली जाऊ नये, असेही अर्नेस्ट यांनी सांगितले. संरक्षण विभागाच्या वेबसाईट हॅक होणे कोणत्याही देशासाठी लज्जास्पद असते. हॅकिंगनंतर सेंट्रल कमांडच्या या वेबसाईटवर चेहरा झाकलेल्या दहशतवाद्याचा फोटो झळकत होता. त्याखाली आय लव्ह इसिस असाही मजकूर टाकला होता.
अमेरिकी सेंट्रल कमांडच्या वेबसाईटवर सायबर हल्ला
By admin | Updated: January 14, 2015 02:10 IST