कुरुंदा : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे सायंकाळी ६.३0 च्या सुमारास घरामधील दोन गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याने एक महिला ठार तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या स्फोटात घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले तर संपूर्ण गाव हादरून गेले.कुरुंदा येथील किसनराव इंगोले यांच्या घरात अचानक गॅस सिलिंडरचे एकापाठोपाठ एक स्फोट झाले. संपूर्ण गाव त्याच्या आवाजाने हादरून गेले. त्यानंतर गावातील लोकांनी घटनास्थळ गाठले. तर रंजना किसन इंगोले (वय ४५) ही महिला जागीच ठार झाली. कोळसा झालेला त्यांचा मृतदेह घरात आढळला. तर मुलगी पूजा ही गंभीर जखमी झाली. या स्फोटामुळे आगीचा भडका उडाला होता. तर भिंती कोसळल्या. घरावरील पत्रेही उडून गेली. या स्फोटामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. घटनास्थळी कुरुंद्याचे सपोनि शंकर वाघमोडे यांनी भेट देवून पाहणी केली. उशिरापर्यंत ग्रामस्थांनी आग विझविली. गॅस सिलिंडरचा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचा उलगडा झाला नाही.
दोन गॅस सिलिंडरचा स्फोट; १ ठार, १ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:24 IST