ग्रामीण भागात बससेवा पोहोचेना
वसमत : तालुक्यातील अनेक गावांमध्ये मागील वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे बंद झालेली बससेवा अद्यापही सुरू न झाल्यामुळे बरेच ग्रामस्थांना खासगी वाहनांद्वारे प्रवास करावा लागत आहे. वयोवृद्ध व अपंग व्यक्तींना बसमध्ये मिळणारी सूट खासगी वाहनात मिळत नसून, त्यांना प्रत्येकांप्रमाणे असणारा तिकिटाचा दर द्यावा लागत असून, हा महागडा प्रवास त्यांना परवडेनासा झालेला आहे.
हरभरा काढणीला व्यत्यय
शेवाळा : कळमनुरी तालुक्यातील शेवाळा परिसरात मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण राहत आहे. यामुळे हरभरा काढणीच्या कामाला मोठा व्यत्यय आला असून, आतापर्यंत काढलेल्या पिकांना कापडाद्वारे झाकून घेण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली. या वातावरणामुळे हरभऱ्याचे पीकही काळे पडत असल्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.
रोहित्र जळाल्यामुळे गावात अंधार
हिंगोली : तालुक्यातील अंभेरी गावातील रोहित्र जळाल्यामुळे गाव मागील पाच दिवसांपासून अंधारात राहत आहे. याचबरोबर, गावात वीजपुरवठा बंद असल्यामुळे अनेक बोअर, मोटार पंप बंद असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी सकाळपासूनच भटकंती करावी लागत आहे. गावात रात्रीच्या वेळी अंधार राहत असल्यामुळे भुरट्या चोरीचे प्रमाणही वाढले आहे.