हिंगोली : कोरोना महामारीने सर्वत्र शिरकाव केल्यानंतरही या काळात जिल्ह्यातील आरोग्य विभागाने क्षयरोग शोध मोहीम सुरूच ठेवली होती. दरम्यान, क्षयरोग शोधमोहिमेअंतर्गत १,१५० रुग्ण शोधण्यात यश मिळाले.
हिंगोली जिल्ह्यासाठी १७०० एवढे उद्दिष्ट देण्यात आलेले होते. खरे पाहिले तर कोरोना काळात एप्रिल ते सप्टेंबर ही सहा महिने बाहेर पडणेही मुश्कील होते.परंतु, जिवाची पर्वा न करता आरोग्य कर्मचाऱ्यांनी क्षयरोग शोधमोहीम सुरूच ठेवली अन् आजही ती सुरूच आहे. कोरोना संसर्गातही जिल्ह्यातील ७११ गावांमध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांनी प्रयत्न करून १,१५० क्षयरोग रुग्ण शोधण्यात यश मिळविले. रुग्ण शोधमोहीम दरवर्षी न चुकता जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत घेण्यात येते. प्रत्येक गावांमध्ये जाऊन क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात येते. यासाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांना मदतीसाठी घेण्यात येऊन जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर क्षयरोग विभाग काम करीत असतो. थुंकीचे नमुने घेतल्यानंतर रुग्ण पॉझिटिव्ह असे तर त्यास औषधोपचार केला जातो. एवढेच नाही तर रुग्ण बरा होईपर्यत त्यावर लक्ष केंद्रित करण्याची जबाबदारीही आरोग्य विभाग पार पाडतो.
गतवर्षी २०२० मध्ये कोरोना महामारीची भीती मनात न ठेवता आरोग्य कर्मचाऱ्यांनी १७०० या दिलेल्या उद्दिष्टांपैकी १,१५० एवढे रुग्ण शोधण्यात यश मिळविले. कोरोना अगोदर २०१९ मध्येही १३५० एवढे क्षयरोग रुग्ण शोधण्यातही आरोग्य विभागाला यशोशिखर गाठता आले. क्षयरुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासण्यासाठी जिल्ह्यात १७ ठिकाणी सूक्ष्मदर्शी यंत्र बसविण्यात आलेले आहेत. यामध्ये हिंगोली, सिरसम, नरसी नामदेव, कळमनुरी, मसवड, आखाडा बाळापूर, डोंगरकडा, सेनगाव, गोरेगाव, औंढा नागनाथ, पिंपळदरी, जवळा बाजार, वसमत, हट्टा, कुरुंदा, गिरगाव आदी आरोग्य संस्थांचा समावेश आहे. जानेवारी २० ते डिसेंबर २० या कालावधीत क्षयरुग्ण शोधण्यासाठी ७११ गावांमध्ये जाऊन क्षयरोगाबाबत जनजागृती करत थुंकीचे नमुने घेण्यात आले.
क्षयरोग उपचाराअंति बरा होतो
क्षयरोग हा दुर्धर आजार आहे असा समज आहे.आपल्या थुंकीचे नमुने शोधमोहिमेदरम्यान आलेल्या कर्मचाऱ्याला द्यावे. त्यानंतर हे कर्मचारी थुंकीचे नमुने सूक्ष्मदर्शी यंत्राद्वारे तपासतील. क्षयरोग आहे हे स्पष्ट झाल्यावर त्यास औषधोपचार केला जातो. क्षयरोग रुग्णांनी घाबरून न जाता औषधोपचार वेळेवर घेतल्यास बरा होऊ शकतो. रोग निष्पन्न झाल्यास संपूर्ण उपचार घेणे आवश्यक आहे. उपचाराअंति क्षयरोग १०० टक्के बरा होतो. अधिक माहिसाठी रुग्णांनी तसेच नातेवाईकांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.
-डॉ.राहुल गिते, जिल्हा क्षयरोगअधिकारी, हिंगोली