औंढा नागनाथ : तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज भरावे लागत आहेत. यातील किचकट अटी व नियमांमुळे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याच्या पहिल्या दिवशी एकाही इच्छुकास आपले नामनिर्देशनपत्र दाखल करता आले नाही.
औंढा नागनाथ तहसील कार्यालयात २३ टेबलवर ग्रामपंचायत उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी २३ डिसेंबर राेजी दिवसभरात एकही नानिर्देशपत्र दाखल झाले नाही. नामनिर्देशनपत्र दाखल करण्यापूर्वी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरणे गरजेचे आहे. यामध्ये विविध कागदपत्रे, जात वैधता प्रमाणपत्र, खर्च करण्यासाठी नवीन बँक बचत खाते यासह विविध बाबींचा समावेश आहे. त्यामुळे ही सर्व कागदपत्रे जमा करण्यासाठी उमेदवार धावपळ करत आहेत. तसेच शहरातील सर्वच ऑनलाइन सेंटरवर उमेदवार गर्दी करीत असल्याचे दिसून आले; परंतु पहिल्या दिवशी एकाही इच्छुक उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केले नाही.