हिंगोली : एमपीएससीच्या वतीने घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना काळात इतर परीक्षा घेण्यात आल्या, तर मग एमपीएससीची परीक्षा का घेता येत नाही, असा सवाल उपस्थित करून विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.
एमपीएससीची परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थी पाहतात. त्यामुळे राज्यभरातील हजारो विद्यार्थी रात्रंदिवस एमपीएससी परीक्षेची तयारी करतात. २०१९ मध्ये एमपीएससीने राज्य सेवा पूर्व परीक्षेची जाहीरात प्रसिद्ध करून अर्ज मागविले होते. या परीक्षेसाठी हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज भरून तयारी सुरू केली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊन व आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावेळी विद्यार्थ्यांनी मनाची तयारी करून पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतरही तीन वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आली. कोरोना काळातच इतर विभागाच्या परीक्षा होत असताना एमपीएससीची परीक्षा का घेतली जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांचे वय निघून जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. हिंगोली येथील आदर्श महाविद्यालयाच्या मैदानावर ११ मार्च रोजी विद्यार्थ्यांनी आक्रोश व्यक्त करीत या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.
नोंद केलेले परीक्षार्थी - १५६०
परीक्षा केंद्रे - ६
परीक्षेची तयारी झाली होती पूर्ण
एमपीएससीच्या वतीने घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षेची प्रशासनाच्या वतीनेही तयारी करण्यात आली होती. जिल्हाभरातील सहा केंद्रांवर एक हजार ५६० विद्यार्थ्यांच्या आसनाची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक विद्यार्थ्यांनी एमपीएससीच्या संकेतस्थळावरून हॉल तिकीटही काढून घेतले होते. परीक्षा दोन दिवसांवर आली असताना ही परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थी संताप व्यक्त करीत आहेत.
परीक्षा रद्द होण्याची तिसरी वेळ
एमपीएससीच्या वतीने राज्य सेवा पूर्व परीक्षेचे २०१९ मध्ये आयोजन करण्यात आले होते. मार्च २०१९ ला होणारी पूर्व परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार होती; परंतु यावेळी मराठा आरक्षण लागू करण्यासंदर्भात मराठा नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता १४ मार्च रोजी होणारी परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याचे एमपीएससीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
रात्रंदिवस एक करून मुले अभ्यास करीत आहेत. स्पर्धा परीक्षेसाठी दिलेला वेळ, पैसा, कष्ट, आई-वडिलांच्या ्अपेक्षांवर हे राजकारणी एका मिनिटात पाणी फेरतात. आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेवेळीही कोरोना होता. तरीही ती परीक्षा घेण्यात आली. मग एमपीएससी परीक्षा घेण्यात अडचण काय? विद्यार्थ्यांच्या भविष्याविषयी चाललेला खेळ थांबवून परीक्षा त्वरित घेण्यात यावी.
- अनिल मोहिते
अनेक दिवसांपासून परीक्षा पुढे ढकलत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यापूर्वी ज्या परीक्षा झाल्या, त्या परीक्षांमध्ये घोळ करण्यात आला असल्याचा संशय आहे. त्यामुळे सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात येऊन रद्द करण्यात आलेली परीक्षा त्वरित घेण्यात यावी.
-किशोर पाटील, गोरेगावकर
विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळू नये. पाच-पाच वर्षे विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास करतात. अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात. परीक्षा रद्द करणे म्हणजे हुकूमशाही पद्धतीने लादलेला निर्णय आहे. या निर्णयाचा पुन्हा विचार करून परीक्षा घ्यावी.
- ए. एम. शेख
मागील सरकारने महापोर्टलला एमपीएससी व पोलीस भरतीच्या परीक्षेचे पेपर काढण्यास सांगितले होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने एका प्रायव्हेट कंपनीला पेपर घेण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले. हे पोर्टल व कंपनी रद्द करून पोलीस भरती व एमपीएससी परीक्षा पारदर्शक पद्धतीने घ्याव्यात. रद्द झालेली परीक्षाही त्वरित घ्यावी.
- सागर पुरी
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी भाड्याने खोली घेऊन अभ्यास करतो. घरची परिस्थिती बेताची असून, अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, परीक्षा पुढे ढकलल्याने मेहनतीवर पाणी फेरले आहे. ही परीक्षा त्वरित व पारदर्शक घ्यावी.
-वैभव आखरे
स्पर्धा परीक्षा चार वेळेस पुढे ढकलली. कोरोनामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात असले तरी विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. रद्द झालेली परीक्षा त्वरित घ्यावी.
- ज्ञानेश्वर सुरशे