हिंगोली : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या वैद्यकीय पथकाकडून ० ते १८ वर्षे वयोगटातील संदर्भीत कर्णबधिर आजाराच्या तपासणीकरिता २० जानेवारी रोजी जिल्हा रुग्णालय येथे कर्णबधीर आजाराच्या विद्यार्थ्यांचे तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरात कर्णबधिर तपासणीकरिता कर्णबधिर तज्ज्ञ डॉ. गीता कदम, डॉ. मथुरा थोरात यांनी तपासणी केली.
शिबिर उद्घाटनप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ. गणेश जोगदंड, शंकर तावडे आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिराकरिता जिल्ह्यातील, तालुक्यातील ५८ कर्णबधिर विद्यार्थ्यांची २० जानेवारी रोजी तपासणी करण्यात आली. त्यापैकी बेरा तपासणीकरिता ११, आयक्यु तपासणी ५, ऑडीओमेट्री तपासणी २७ व कोक्हेलीअर इम्प्लांट ११ शस्त्रक्रियाकरिता मिरज येथे संदर्भीत करण्यात आले.
या शस्त्रक्रियेमध्ये लहान मुलांचे कर्णबधिरच्या गंभीर शस्त्रक्रियांचा समावेश आहे. शिबिरात मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात आला आहे. शिबिर यशस्वी करण्याकरिता डॉ. नांदुरकर, डॉ. विसलकर, डॉ. बेंगाळ, लक्ष्मण गाभणे, ज्ञानोबा चव्हाण, किरवले, प्रवीण इंगळे, सुदर्शन जाधव तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माता, ए.एन.एम. व कार्यालयीन कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.