बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर वाहने
हिंगोली : येथील बसस्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारासमोरच ऑटोरिक्षा उभी केली जात आहेत. त्यात दुचाकी वाहनेही बसस्थानक परिसरात कुठेही उभी केली जात असल्याने बसचालकांना कसरत करावी लागत आहे. अनेकवेळा प्रवासी घेण्याच्या नादात काही चालक थेट वाहने बसस्थानकाच्या आवारात नेत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. याकडे लक्ष देऊन प्रवेशद्वार आडविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने
हिंगोली: शहरात अनेक भागात अल्पवयीन मुले वाहने चालविताना दिसून येत आहेत. एक तर वाहतुकीचे कोणतेही नियम माहीत नाहीत. त्यात भरधाव वाहने चालविली जात असल्याने अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. याकडे लक्ष देऊन अशा मुलांच्या पालकांना समज देऊन अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देऊ नयेत यासाठी पालकांचे समुपदेशन करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
एसटी बसला प्रवाशांची गर्दी
हिंगोली : येथील आगारातून अकोला, नांदेड, परभणी, सेनगाव आदी मार्गावर बसेस धावतात. येथील आगारातील काही बसगाड्या मुंबई येथे पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासी वाहतुकीसाठी बसगाड्या अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच उपलब्ध असलेल्या बसेसला प्रवाशांची गर्दी होत असल्याचे पहावयास मिळत आहे. आगारात जादा बस उपलब्ध करून त्या विविध मार्गावर सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.
जिल्हा रूग्णालयात रूग्णांची गर्दी
हिंगोली : येथील जिल्हा रूग्णालयात विविध आजारावर उपचार करणारे डॉक्टर असल्याने जिल्हाभरातून रूग्ण उपचारासाठी येत आहेत. दोन दिवसांपासून विविध आजाराच्या रूग्णांसह इतर कामानिमित्त येणाऱ्या नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे चित्र रूग्णालयात पहावयास मिळत आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी रूग्णालयास भेट देऊन विविध आजारांच्या रूग्णांची विचारपूस केली होती.
धोकादायपद्धतीने वाहने उभी
हिंगोली: शहरातील औंढा नागनाथ रोडवर अनेक चालक मुख्य रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी करीत असल्याचे चित्र आहे. अनेकवेळा दोन्ही बाजूंनी वाहने आल्यास वाहतूक विस्कळीत होत आहे. विशेष म्हणजे वाहने उभी करून बराच वेळ चालक इतरत्र फिरत असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. या मार्गावर विनाकारण वाहने उभी करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
तुरीच्या उत्पादनात घट
हिंगोली: कळमनुरी तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी कापसासोबत तूर पीक घेतले आहे. जास्त पाऊस झाल्याने तुरीचे पीक जोमात वाढूनही वाळून गेले होते. आता तूर कापणी जवळपास संपत आली असून मळणीयंत्राद्वारे पिकाची काढणी केली जात आहे. परंतु, उत्पादनात मोठी घट होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यातून फवारणीचा केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.