ग्रामीण भागात राजकीय पुढाऱ्यांचे निष्ठावंत म्हणजे, स्वत: नेताच असल्यासारखी निवडणुकीत चुरस निर्माण करतात. या नेतेमंडळींच्या नावावरच अनेक गावांत निवडणुका होतात. राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीत आघाडी झाली असली तरीही हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी गावपातळीवर या सर्व पक्षांचे गट-तट कधी कोणाशी सलगी करतील, याचा काही नेम नाही. तरीही ढोबळमानाने हिंगोली व सेनगाव तालुक्यात आ. तान्हाजी मुटकुळे विरुद्ध माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर अशाच लढतींचे चित्र राहणार आहे. कळमनुरी व औंढा तालुक्यातही अनेक ठिकाणी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशा लढती होतात. खा. राजीव सातव व आ. संतोष बांगर यांच्या गटातटांतच या लढतींची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी त्यात भाजपचा शिरकाव होण्याची शक्यता आहे. मात्र, किती ठिकाणी हे सांगणे अवघड आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादीचेही परंपरागत गट आहेत.
वसमत तालुक्यातही यापूर्वीचा सामना राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच असायचा. जयप्रकाश दांडेगावकर व जयप्रकाश मुंदडा या नेत्यांतीलच या लढती मानल्या जायच्या. आता याठिकाणीही भाजपकडून आखणी केली जात आहे. राष्ट्रवादीचे आ. राजू नवघरे हे बिनविरोधची आवाहने करीत आहेत. तर शिवसेनेला सोबत घेतले तरीही भाजपची मंडळी त्याला राजी होईल, असे दिसत नाही.
जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या दृष्टीने शिवसेना वगळता इतर कोणत्याही पक्षाने कोणताही राजकीय कार्यक्रम घेतला नाही. स्थानिक कार्यकर्त्यांना लढण्यासाठी सूचना तेवढ्या दिल्या. शिवसेनेने मात्र खा. हेमंत पाटील, संपर्कप्रमुख आनंद जाधव, आ. संतोष बांगर यांच्या उपस्थितीत मेळावा घेतला.
नेत्यांचे प्राेत्साहन
नेतेमंडळींनी आपापल्या कार्यकर्त्यांना आगामी जि.प. व पं.स. निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या ताब्यात जास्तीत जास्त ग्रामपंचायती राहण्यासाठी प्रोत्साहन देणे सुरू केले आहे.
जि. प. , पं. स. कडे लक्ष
ग्रा.पं.च्या माध्यमातून जि. प. व पं. स. चे आराखडे आखले जात आहेत. सध्या जि. प. त सेना १५, राष्ट्रवादी १२, काँग्रेस १०, भाजप ११ व अपक्ष असे संख्याबळ असून स्वबळवाढीसाठी लढा सुरू आहे.