‘हरभरा कापणी उरकून घ्यावी’
हिंगोली: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी करुन घ्यावी.हरभरा परिपक्वतेच्या काळात पाने पिवळी पडून घाटे वाळू लागतात. तेव्हा कापणी वेळेवर करावी, पीक जास्त वाळल्यास घाटेगळ होऊन नुकसान होते, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
करडईची कापणी सकाळी करण्याचे आवाहन
हिंगोली: करडई पिकाला काटे असल्याने त्याची कापणी रात्रीच्यावेळी करु नये. सकाळी किंवा दुपारी करडईची कापणी केल्यास कापणाऱ्यांना काटे टोचणार नाहीत. करडईची कापणी करुन सुरक्षित ठिकाणी करडईच्या पेंढ्या ठेवाव्यात, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.
पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन
हिंगोली: पशुधनास मुबलक स्वच्छ पाणी आणि सकस खाद्य कसे उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करावी. पाण्यामधून गूळ अथवा ताण प्रतिरोधक औषधे देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी सर्व पशुधनाचे उन्हापासून संरक्षण करावे.एवढेच नाही तर पशुंना दुपारच्यावेळेला सावलीत बांधावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
आजपासून पाच दिवस आकाश स्वच्छ राहणार
हिंगोली: प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या अंदाजानुसार १० ते १४ मार्च असे पाच दिवस जिल्ह्यात आकाश स्वच्छ राहणार असून काही प्रमाणात ढगळाही राहील. १० मार्च रोजी आर्द्रता १२ टक्के, ११ रोजी ११ टक्के, १२ रोजी १२ टक्के, १३ रोजी १५ टक्के, १४ रोजी २२ टक्के राहील, अशी माहिती ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाच्या वतीने देण्यात आली.