हिंगोली : येथील जिल्हा रुग्णालयात किडनी ट्रान्सप्लांटेशन करण्यासाठी पुरेशा सुविधा व किडनी ट्रान्सप्लांटेशन करणारे तज्ज्ञ डॉक्टर नसल्यान रुग्णांना औरंगाबाद, मुंबई येथे जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. येथे केवळ रुग्णांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
कोरोनाच्या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने टप्प्याटप्प्याने काही व्यवहार सुरू झाले; परंतु कोरोनाच्या काळात सर्वांत जास्त फटका विविध आजार असणाऱ्या रुग्णांना बसला. काही रुग्णांना शस्त्रक्रियेपासून वंचित राहावे लागले. कोरोनामुळे किडनी ट्रान्सप्लांटेशनच्या शस्त्रक्रिया ठप्प झाल्या होत्या. हिंगोली जिल्ह्यातील किडनी खराब झालेल्या रुग्णांना तर मोठा त्रास सहन करावा लागला. अगोदरच जिल्ह्यात किडनी ट्रान्सप्लांटेशन करण्यासाठीची सुविधा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध नाही. केवळ अशा रुग्णांची तपासणी केली जाते. किडनी ट्रान्सप्लांटेशन करण्याची सुविधा नसल्याने बहुतांश रुग्ण औरंगाबाद, मुंबई अशा मोठ्या शहरातील दवाखान्यात दाखल होतात. जिल्ह्यातही किडनी ट्रान्सप्लांटेशन करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी रुग्णांतून होत आहे.
किडनी दाता मिळाल्यास रुग्णाचे वाचतात प्राण
एखाद्या व्यक्तीच्या दोन्ही किडन्या खराब झाल्यास अशा रुग्णाची प्रकृती ढासळत जाते. अशा रुग्णांना किडनी ट्रान्सप्लांटेशनची गरज असते. रक्त गट समान असणाऱ्या कोण्याही किडनी दात्याची एक किडनी घेऊन गरजू रुग्णांना बसविली जाते. यातून रुग्णाचे प्राण वाचतात. मात्र, रुग्णांना मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागते.
प्रतिक्रिया
जिल्हा रुग्णालयात रुग्णांना वेळेवर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. किडनी ट्रान्सप्लांटेशनची सुविधा उपलब्ध नसली तरी अशा रुग्णांची येथे तपासणी केली जाते. किडनी ट्रान्सप्लांटेशनसाठी रुग्णाला औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय, मुंबई येथील ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो.
-डॉ. राजेंद्र सूर्यवंशी
जिल्हा शल्य चिकित्सक , जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली