हिंगोली: हृदयरोगी, रक्त पातळ होण्याच्या गोळ्या घेणारे, वेगवेगळी ॲलर्जी असलेले व इतर कुठल्याही आजारी व्यक्तींनी लस घेतली तर ती लाभदायकच आहे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
आजारी माणसांनी कोरोना लस घ्यावी की नाही? याबाबत काही व्यक्तींमध्ये प्रश्न होते; परंतु तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते आजारी व्यक्तींनी किंतू, परंतु न करता कोरोना लस आवश्यक घ्यावी. एखादा व्यक्ती नेहमीच आजारी राहत असेल किंवा एखाद्या व्यक्तीस ताप जास्तीचा असेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच कोरोना लसीचा लाभ घ्यावा. जिल्ह्यात ८ मार्चपर्यंत १ हजार २१७ साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना लसीचा लाभ घेतला आहे. तर १३ हजार १९० प्रगतीपथावर लसीकरणाची संख्या आहे. ४५ ते ६० वर्षांखालील नागरिकांनी तज्ज्ञ डॉक्टरांना भेटून तसे प्रमाणपत्र सादर करून कोरोना लसीचा लाभ घ्यावा. भविष्यात इतर आजारांवर कोरोना लस ही लाभदायक असल्याचेही तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मागील पंधरा-वीस दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना महामारीचे रुग्ण कमी-जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी विना मास्क बाजारात फिरु नये. घरी असो किंवा दारी, सॅनिटायझरचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा. प्रत्येक वेळेस डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोरोना आजार समूळ नष्ट होईपर्यंत स्वत:बरोबर इतरांचीही काळजी प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहनही तज्ज्ञ डॉक्टर मंडळींनी केले आहे.
१३ हजार १९०
जणांना आतापर्यंत दिली लस
१ हजार २१७
इतक्या ज्येष्ठ नागरिकांना दिली लस
प्रतिक्रिया
४५ ते ६० खालील व्यक्तींनी तसेच इतर आजार असलेल्या व्यक्तींनी कोरोना लस घेणे लाभदायक आहे. कोरोना लसीमुळे कोणताही दुष्परिणाम होणार नाही. काही शंका असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
-डॉ. नारायण भालेराव, फिजिशियनतज्ज्ञ
आजार कोणताही असो, कोरोना लस लाभदायकच आहे. बीपी, शुगर, हदयरोग या आजारांनी तर कोरोना लस घेणे आवश्यक आहे. लस घेतल्यास ९० ते ९४ टक्के दवाखान्यात जाण्याची गरज पडणार नाही. इतर आजारांवर ही लस मात करते.
-डॉ. इमरान खान, हृदयरोगतज्ज्ञ
ॲलर्जी, रक्त पातळ होण्यासाठी गोळ्या घेणे या आजारी माणसासाठी ही कोरोना लस लाभदायक आहे. जे व्यक्ती रक्त पातळ होण्यासाठी गोळ्या घेत असतील तर त्यांनी लस घेतली तर काही गैर नाही; पण डॉक्टरांचा सल्लाही आवश्यक आहे.
-डॉ. संतोष दुरुगकर, मूत्रपिंड विकारतज्ज्ञ
लस म्हणजे ट्रीटमेंट नाही. भविष्यातील आजार दूर करणारी ही लस आहे, हायपर टेंशन व इतर आजारी माणसांनीही लस घेण्यासाठी आडेवेडे न घेता लस अवश्य घ्यावी. कोरोना लस लाभदायकच अशी आहे.
-डॉ. प्रवीण गिरी, मधुमेहतज्ज्ञ.