कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा, दाती, भोसी तसेच दांडेगाव परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हरभरा पिकाचे उत्पादन घेतली जाते. यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे समाधानकारक असे उत्पादन मिळाले नसल्यामुळे संपूर्ण वर्ष दुष्काळामध्ये गेल्यासारखे झाले आहे. त्यामध्ये अधिक भर म्हणून मागील दोन दिवसांपूर्वी पासून सतत ढगाळ वातावरण असल्यामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव होण्याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. काही भागांमध्ये हरभऱ्याला फुले लागत असून या वातावरणामुळे फुले गळून जाण्याची शक्यता अधिक असते. तसेच ह्या परिसरामध्ये हरभरा सोबतच गव्हाचे देखील मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. या दोन्ही पिकांना कडाक्याच्या थंडीची आवश्यकता असते. परंतु ढगाळ वातावरणाचा या पिकावर विपरित परिणाम होतो. मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये हरभरा व गहू काढणीच्या वेळी जोरदार असा अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि काही ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला होता. परिणामी कोरडवाहूू शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. ढगाळ वातावरणामुळे या वर्षी तरी गहू आणि हरभरा तरी हाती लागतो का नाही ही चिंता शेतकऱ्यांना लागलेली आहे.
ढगाळ वातावरणामुळे हरभरा उत्पादक चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:38 IST