हिंगोली शहरातील देवडानगर, चित्रा कलर लॅब व मोंढा भागातील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये छेडछाड करून ४६ हजार ५०० रुपये लांबविल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात १९ जून राेजी चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांनी तपास सुरू केला होता. सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावरून हिंगोली शहरालगतच्या वासाहतीतून एकास ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता या प्रकरणात आणखी तिघे असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी इतर तिघांचा शोध घेण्यासाठी पथके पाठविली असता जालना येथून एकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. तर दोघे राज्याबाहेर पळून गेल्याची माहिती असून पोलीस पथक त्यांच्या मागावर असल्याचे सांगण्यात आले.
एटीएममधील पैसे लांबविल्याप्रकरणी दोघांना घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:20 IST