हिंगोली: शासनाच्या नवीन धोरणानुसार नोंदणीकृत फेरीवाल्यांना दीड हजार रुपये खात्यात जमा करण्याचे जाहीर केले होेते. काहींना मदत मिळाली, तर काहींना मात्र अजूनही प्रतीक्षा करावी लागत असल्याचे शहरातील फेरीवाल्यांनी सांगितले.
जिल्ह्यात नोंदणीकृत फेरीवाले १,७३१ आहेत, तर नोंदणी नसलेल्या फेरीवाल्यांची संख्या ३००च्या जवळपास आहे. कोरोना काळात फेरीवाले उपाशी राहू नयेत, म्हणून शासनाने नवीन धोरणानुसार त्यांना दीड हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले होते. शहरातील नोंदणीकृत फेरीवाल्यांना मदत येणे सुरू झाले असले, तरी काहींना नोंदणी करूनही अजून दीड हजार रुपये खात्यात जमा झालेले नाही, असे फेरीवाल्यांचे म्हणणे आहे. शहरात नोंदणी नसलेले फेरीवाले हे तीनशेच्या जवळपास आहेत. त्यांचे तर बेहाल होत आहेत. आज इथे तर उद्या तिथे बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. नोंदणी नसलेल्या फेरीवाल्यांना कोणीच वाली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. शासनाने नोंदणी नसलेल्या फेरीवाल्यांना काहीतरी आर्थिक अनुदान देऊन कुटुंबाची होत असलेली उपासमार थांबवावी, अशी मागणी नोंद नसलेल्या फेरीवाल्यांनी केली आहे.
दोन महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. बाजारपेठही बंद राहत आहे. अशा परिस्थितीत व्यापार कसा करावा, दोन पैसे कसे कमवावे, लेकरांबाळांना काय खाऊ घालावे, असे अनेक प्रश्न नोंदणीकृत आणि नोंदणी नसलेल्या फेरीवाल्यांनी उपस्थित केले आहेत.
जिल्ह्यातील नोंदणीकृत फेरीवाले-१,७३१
नोंदणी नसलेल्यांची संख्या ३००
प्रतिक्रिया
फेरीवाले काय म्हणतात....
नोंदणीकृत फेरीवाल्यांच्या खात्यात शासन पैसा टाकणार आहे. आमची तर कुठे नोंदही नाही. काहींना पैसा मिळाला आहे. कोरोना काळात आम्हालाही शासनाने मदत करावी.
- मुजीबभाई बागवान, फेरीवाले.
सध्या कोरोना काळात आमचे हाल होत आहेत. बाजारपेठ बंद ठेवल्या जात असल्यामुळे विकत घेतलेला माल गल्लोगल्ली विकता येत नाही. परिणामी, लेकराबाळांची उपासमार होत आहे. नोंदणीकृत फेरीवाल्याप्रमाणे आम्हालाही शासनाने आर्थिक मदत करावी.
-महमद उमर, फेरीवाले.
कोरोना काळात खूप हालअपेष्टा होत आहेत. भाजी, फळेही विकता येत नाहीत. विकत घेतलेल्या भाज्या, फळे शिल्लक राहत आहेत. त्यामुळे त्याची नासाडी होत आहे. जिल्हा प्रशासनाने काहीतरी आर्थिक मदत करावी.
-शाहेद बागवान, फेरीवाले.
कोरोना काळात फेरीवाले उपाशी राहू नये, म्हणून नोंदणीकृत फेरीवाल्यांना मदत देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. ही मदत शासन त्यांच्या खात्यावर टाकणे सुरू आहे. शासनस्तरावर हा आर्थिक व्यवहार सुरू आहे.
- बाळू बांगर, स्वच्छता निरीक्षक, न. प. हिंगोली.
फोटो १