हिंगोली : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठय़ा प्रमाणात 'वाटप' झाले. काही जणांना तर पोलिसांनी पकडलेही. मात्र त्यानंतरही हा प्रकार सुरू होता. आता पराभव झाल्याने काहींनी वसुली सुरू केली आहे. त्यात काहींची फसगत झाली आहे.
जिंकण्याच्या इर्षेने साम, दाम, दंड, भेद या सर्व नीतींचा वापर केला जातो. यातील दामावर तर सर्वाधिक भर असतो. हे दाम घेतल्यानंतरही अनेकांनी काम केले नाही. काहींनी काम केले असले तरी मतदारांनी 'काम' दाखविले. परिणामी, 'त्या' गावातील बुथवर झालेली कमाल उमेदवारांना मतमोजणीनंतर प्रत्यक्ष दिसूनच आली. तेथे पडलेली मते अन् झालेल्या वाटपाचा ताळमेळ बसणे तर सोडाच मात्र त्याच्या पाषाणालाही पुरणारी मते नाहीत. हा खर्च व्यर्थ गेला की संबंधिताच्या 'खिशात' यासाठी तपासणी होत आहे. जोर लावून 'खिसा' खाली करवून घेण्याचे प्रकारही घडत आहेत. या प्रकारात ज्यांनी खरेच काम न करता खिसा गरम केला होता, ते निमूटपणे वाटपाची रक्कम परत करीत आहेत. मात्र ज्यांनी वाटप करूनही काम झाले नाही, त्यांचे अवघड झाले आहे. मतदारांपर्यंत हे लोण पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे-जे वाटपाचे लाभार्थी झाले, ते आता दिवाळीतच अडचणीत येण्याची शक्यता आहे. काहींच्या घरात 'वाटपा'मुळे दिवाळीचा प्रकाश पडला असला तरी दारात वसुलीदार उभा राहिल्यानंतरच डोक्यात 'प्रकाश ' पडणार आहे. आगामी काळात याचे अनेक किस्से ऐकायला मिळतील. कदाचित यावरून काही जणांचा झालेला संताप तंटेही उद्भवणारा ठरू शकतो.