वार्षिक सर्वसाधारण सभेतील निर्णयनाशिक : चार तालुक्यांतील कार्यक्षेत्र असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना चालू राहणे गरजेचे असून, तो सहभागी अथवा भाडेतत्त्वावर मुंबईस्थित ओबेरॉय यांच्या मे. बॉम्बे एस. मोटर्स कंपनीला चालविण्यास देण्याबाबतच्या निर्णयास सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.नासाकाच्या कार्यस्थळावर नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ व सभासदांची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. विशेष म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी निफाड साखर कारखानाही याच कंपनीला भाडेतत्त्वावर चालविण्यास देऊन तो सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. कारखान्याचे अध्यक्ष देवीदास पिंगळे यांनी कारखान्याच्या सद्यस्थितीची माहिती देऊन तो सरकारी अथवा खासगी तत्त्वावर चालविण्यास देण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ सभासद पां. भा. करंजकर, तानाजी गायधनी, पी. बी. गायधनी, पोपटराव म्हस्के, विष्णुपंत गायखे, बबन कांगणे, ॲड. सुभाष हारक, काशीनाथ जगळे आदिंनी सूचना मांडत चर्चेत सहभाग घेतला. कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी विद्यमान संचालक मंडळाला अधिकार देण्याबाबत चर्चा झाली. सभेस उपाध्यक्ष जगन आगळे, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, विष्णू कांडेकर, ॲड. जे. टी. शिंदे, मुरलीधर पाटील, मधुकर जगळे, अशोक डावरे, संतू पाटील, डॉ. सुनील ढिकले, अनिता करंजकर, तुकाराम पेखळे यांच्यासह संचालक व सभासद उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नाशिक साखर कारखान्याचा भाडेतत्त्वाचा मार्ग मोकळा
By admin | Updated: September 30, 2014 22:27 IST