विशेष सभा तहकूब : उपाध्यक्ष गहाणेंकडे अर्थ व बांधकाम, पी.जी. कटरेंकडे शिक्षण-आरोग्य खातेगोंदिया : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सदस्य निवडीसाठी मंगळवारी आयोजित विशेष सभा जि.प. सदस्यांच्या मागणीनुसार मध्येच तहकूब करण्यात आली. त्यामुळे विषय समित्यांच्या सदस्यांची निवड होऊ शकली नाही. मात्र अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी तीनही विषय समित्यांच्या सभापतींची निवड जाहीर केली. त्यात जि.प. उपाध्यक्षांकडे अनेक वर्षानंतर शिक्षण व आरोग्य या खात्याऐवजी अर्थ व बांधकाम खाते देण्यात आले.काँग्रेसचे पी.जी. कटरे यांच्याकडे शिक्षण व आरोग्य हे खाते देण्यात आले. तर छाया दसरे यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी देण्यात आली. महिला व बालकल्याण सभापती म्हणून विमल नागपुरे आणि समाजकल्याण सभापती म्हणून देवराज वडगाये यांची निवड दि.३० जुलैलाच झाली होती. उर्वरित तीन सभापतींचे खातेवाटप जाहीर करण्यासोबतच विविध विषय समित्यांच्या सदस्यांची निवड करण्यासाठी मंगळवारी दुपारी १ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष सभेला सुरूवात झाली.सुरूवातीला अध्यक्षांनी तीनही सभापतींचे खातेवाटप जाहीर केले. त्यानंतर विषय समित्यांच्या सदस्यत्वासाठी नामनिर्देशन भरण्यास सांगण्यात आले. यात तीनही प्रमुख पक्षांच्या सदस्यांनी नामांकन भरले. त्यानंतर उपमुख्य कार्यपालन अधिकारी (सामान्य) आर. एल. पुराम यांच्या यांनी नामांकनांची वैधता तपासली. त्यात सर्वच नामांकन वैध ठरले. त्यामुळे नामांकन मागे घेण्यासाठी पुराम यांनी सदस्यांना वेळ दिला. पण त्याचवेळी बहुतांश जि.प.सदस्यांनी सभा तहकूब करण्याची मागणी केली. त्यामुळे अध्यक्ष उषाताई यांनी पुढील प्रक्रिया स्थगित ठेवून सभा तहकूब केली. (जिल्हा प्रतिनिधी)अशी राहणार १० समित्यांची सदस्यसंख्या४जिल्हा परिषदेत एकूण १० समित्यांसाठी सदस्यांची निवड होणार आहे. त्यात स्थायी समितीत ८ सदस्य, जलव्यवस्थापन ६, कृषी १०, समाजकल्याण ११, शिक्षण व क्रीडा ८, बांधकाम ८, आरोग्य ८, पशुसंवर्धन ८, महिला व बालकल्याण ८ आणि अर्थ समितीत ८ सदस्य अशा एकूण ८३ सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक सदस्याला चार समित्या होऊ शकतात अविरोध४१० पैकी ४ विषय समित्यांची निवड अविरोध होऊ शकते. त्यात अर्थ, बांधकाम, पशुसंवर्धन आणि आरोग्य या समित्यांचा समावेश आहे. या समित्यांच्या सदस्यसंख्येपेक्षा एक-एक नामांकन जास्त आले आहे. गुरूवारी नामांकन मागे घेण्याच्या वेळी ते नामांकन मागे घेतल्यास चारही समित्यांची निवड अविरोध होऊ शकते. गुरूवारी होणार पुढील कार्यवाही४मंगळवारी दुपारी ४.१५ वाजताच्या सुमारास सभा तहकूब करण्याचा निर्णय अध्यक्षांनी जाहीर केला. त्याचवेळी विषय समित्यांच्या सदस्यांची निवड प्रक्रिया गुरूवारी (दि.१३) दुपारी १ वाजता विशेष सभा पुढे चालू ठेवून केली जाईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे गुरूवारी पुन्हा नामांकन भरण्याची गरज राहणार नसून केवळ नामांकन मागे घेण्याची संधी सदस्यांना दिली जाणार आहे.अधिकाऱ्यांना कायद्याचा विसर ४जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांवरील सदस्यांच्या निवडीसाठी विशेष सभा बोलविण्यात आली. या निवडणुकीसाठी सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या नोटीसमध्ये समाजकल्याण समितीवर नऊ सदस्य निवड करावयाचे आहेत, असे दाखविण्यात आले आहे. परंतु महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील तरतुदीनुसार समाजकल्याण समितीवर ११ सदस्य निवडावयाचे स्पष्ट असताना सुद्धा जि.प.च्या अधिकाऱ्यांनी एवढी मोठी चूक करुन जिल्हा परिषदेचा कारभार किती भोंगळ आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी केला आहे. गोंदिया जि.प.च्या वतीने एवढी चूक व्हावी, हे हास्यास्पद असून याची चौकशी व्हावी, अशी मागणी परशुरामकर यांनी केली आहे.
जि.प. सभापतींची खांदेपालट
By admin | Updated: August 12, 2015 02:08 IST