शासनाचा अहवाल : जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ८१ पैसेगोंदिया : यावर्षी अनियमित पावसामुळे पिकांची स्थिती बिकट झाली आहे. धानाला पोषक ठरेल असा योग्य वेळी आणि पुरक प्रमाणात पाऊस आला नसल्यामुळे धानाचे अपेक्षित उत्पन्न होणार किंवा नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. आता जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या अहवालानुसार नजरअंदाज पैसेवारी ८१ पैसे दाखविली आहे. गेल्यावर्षी हीच नजरअंदाज पैसेवारी १०८ होती. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी स्थिती वाईट असल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ९७ हजार हेक्टरवर पिकांची लागवड होते. त्यात मुख्य पिक असलेल्या धानावरच शेतकऱ्यांचे वार्षिक बजेट अवलंबून असते. बारमाही ओलिताची सोय नसल्यामुळे मोजक्याच शेतजमिनीवर रबी हंगामात धानाची लागवड होते. अशा परिस्थिती शेतकऱ्यांची संपूर्ण मदार खरीप हंगामावरच असताना यावर्षी या हंगामात अपेक्षित उत्पन्न होण्याची शक्यता धुसर झाली आहे.१ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत १३४० मिमी पाऊस पडतो. मात्र यावर्षी हा कालावधी संपत आला असताना जेमतेम १००० मिमी पाऊस पडला आहे. त्यातच हा पाऊस योग्य वेळी आला नसल्यामुळे पाण्याअभावी पिकांची वाढ पाहीजे तशी झाली नाही. परिणामी धान किती भरणार आणि पिक कसे येणार याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. गेल्यावर्षीसुद्धा पाऊस कमी होता. मात्र शेवटी-शेवटी पावसाने बरीच कसर भरून काढली होती. गेल्यावर्षी नजरअंदाज पैसेवारी १०८ पैसे असताना यावर्षी ती ८१ पैशापर्यंत खाली घसरली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा उत्पन्नात घट येणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)पैसेवारी पुन्हा काढणारशासनाच्या आदेशानुसार आतापर्यंत ५० टक्केच्या आत पैसेवारी असणारी गावे दुष्काळग्रस्त समजली जात होती. मात्र शासनाने यावर्षी पैसेवारी ६७ पैशापेक्षा कमी असणारी गावे दुष्काळसदृश समजून मदतीस पात्र राहतील, असा आदेश काढला होता. मात्र आता तो आदेश मागे घेतला असून पुन्हा ५० पैशाचा निकष लावण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे जाहीर केलेली पैसेवारी बदलण्याची शक्यता असून पुन्हा ३० सप्टेंबरला नवीन पैसेवारी जाहीर केली जाणार आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्याची पैसेवारी सर्वाधिकयावर्षीच्या नजरअंदाज पैसेवारीवर एक नजर टाकल्यास अर्जुनी मोरगाव तालुक्याची पैसेवारी सर्वाधिक, अर्थात ९३ पैसे आली आहे. तर सर्वात कमी ६७ पैसे देवरी तालुक्याची पैसेवारी आहे. तिरोडा तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला असतानाही तेथील पैसेवारी ८३ पैसे आहे, हे विशेष. अर्जुनी मोरगाव तालुक्यात शेतकऱ्यांना सिंचनाची सोय असल्यामुळे तेथील पिकांची स्थिती चांगली असण्याची शक्यता आहे.देवरीत सर्वात बिकट परिस्थितीशासनाच्या नवीन निकषानुसार ६८ पैशापेक्षा कमी पैसेवारी असणारी गावे दुष्काळसदृश समजली जात होती. त्यानुसार जिल्ह्यात ६८ गावांची नजरअंदाज पैसेवारी ६७ पेक्षा कमी दाखविण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक ६६ गावे देवरी तालुक्यातील आहेत. मात्र आता हा मदतीबाबतचा निकष पुन्हा बदलविला जात आहे.
गेल्यावर्षीपेक्षा स्थिती बिकट
By admin | Updated: September 25, 2015 02:15 IST