अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींमध्ये असलेले सर्व ग्राम रोजगार सेवक साेमवारपासून (दि. २६) काम बंद आंदोलन करणार आहेत. चार वर्षांपासून प्रवास भत्ता, अल्पोपाहार भत्ता व प्रलंबित विविध मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
सन २००६ पासून ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्राम रोजगार सेवक पद शासनाने अस्तित्त्वात आणले. रोजगार हमी योजना कामाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामरोजगार सेवकाची महत्त्वाची भूमिका आहे. अंदाजपत्रक तयार करण्यापासून ते रोजगार हमीची कामे सुरू करून हजेरी पत्रक पूर्णतः भरून मजुरी अदा करणे व इतर कामे ग्राम रोजगार सेवकांकडून करवून घेतली जातात. याचा मोबदला म्हणून ग्राम रोजगार सेवक यांना सव्वा दोन टक्के मानधन म्हणजेच मजुरांची मजुरी एक लाख रुपये शासन अदा करते. तेव्हा ग्राम रोजगार सेवकाला दोन हजार दोनशे पन्नास रुपये मानधन मिळते. तसेच ग्रामपंचायत ते पंचायत समिती स्तरावर जाणे-येणेसाठी प्रवास भत्ता व अल्पोपाहार भत्ता देण्याची शासनाची तरतूद आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून प्रवास भत्ता व अल्पोपाहार भत्ता न मिळाल्याने अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकावर उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भाने गेल्या महिन्यात संघटनेच्यावतीने साखळी उपोषण व कामबंद आंदोलन करण्यासंदर्भाने अर्जुनी - मोरगाव खंडविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मात्र, खंडविकास अधिकारी यांनी संघटनेला लेखी आश्वासन देऊन आपल्या मागण्या येत्या आठ दिवसात सोडवू. आंदोलन करू नका व तसे लेखी आश्वासनसुद्धा दिले.
........
प्रशासनाला आश्वासनाचा विसर
येत्या आठ दिवसात आपल्या मागण्या पूर्ण केल्या जातील. आंदोलन करून कामे बंद करू नका. असे आश्वासन दिल्याने संघटनेने काम बंद आंदोलन मागे घेतले. मात्र, संबंधित अधिकारी यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे सोमवारपासून अर्जुनी - मोरगाव तालुका ग्राम रोजगार सेवक संघटनेच्यावतीने अर्जुनी - मोर तालुक्यातील सर्व ७० ग्रामपंचायतींमध्ये कामबंद आंदोलन करण्यात येत आहे.
.........
प्रतिक्रिया
ग्राम रोजगार सेवक यांना अगदी अल्प कमिशन टक्केवारीमध्ये, तर प्रवास भत्ता व अल्पोपाहार भत्ता देण्याची तरतूद असूनही गेल्या चार वर्षांपासून दिला गेला नसल्याने तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना काळात ग्राम रोजगार सेवक जीवावर उदार होऊन रोजगार हमीची कामे चालवित आहेत. मात्र, शासनाने अद्याप आमच्या समस्यांची दखल घेतली नाही.
- संतोष रोकडे, अध्यक्ष तालुका ग्रामरोजगार सेवक संघटना,
.......
सन २०१६ - १७ ते २०१९ - २० या चार वर्षांचा प्रवास भत्ता व अल्पोपाहार भत्ता यांचे देयक मिळण्यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव तयार करून देण्यात आले आहेत. मात्र, पंचायत समितीच्या दुर्लक्षित धोरणामुळे प्रवास भत्त्याची रक्कम थकीत आहे.
- नेमीचंद ब्राम्हणकर, सचिव, तालुका ग्रामरोजगार सेवक संघटना.
.....