सालेकसा : महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेला आणि तीन राज्यांना जोडणारा सालेकसा तालुका गोंदिया जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यांपैकी सर्वात मागासलेला व अविकसित तालुका आहे. हा तालुका जिल्ह्यातच नाहीतर संपूर्ण विदर्भात सर्वात जास्त अविकसित तालुक्यांपैकी एक तालुका आहे. बेरोजगारीसह अनेक समस्यांनी ग्रस्त या तालुक्याला विकासाची पहाट केव्हा पहायला मिळेल, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांना महाराष्ट्राशी जोडणारा हा तालुका अतिदुर्गम, संवेदनशील व नक्षलग्रस्त भागात मोडतो. या तालुक्यात घनदाट वनसंपदा आहे. यात मोठ्या भूभागावर शेतीचे काम होते. भातपिक घेणे येथील मुख्य व्यवसाय आहे. परंतु या तालुक्यात काही छोटे व मध्यम सिंचन प्रकल्प अनेक वर्षापासून रखडले आहेत. त्यामुळे या तालुक्यातील शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या खूपच मागासलेला आहे. या तालुक्यात कोणत्याही प्रकारचे उद्योग धंदे व कारखाने स्थापित नसल्याने बेरोजगारीचे प्रमाण खूपच जास्त आहे. त्यामुळे या तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर महिला पुरूष रोजगारासाठी शहराकडे पलायन करीत असतात. अनेक युवक वाईट सवयी व अवैध धंद्यांच्या आहारी जातात. यातूनच सामाजिक गुन्हे सुध्दा घडत आहेत.सालेकसा तालुक्याचा प्रशासकीय कामकाज पूर्णपणे अप-डाऊन प्रणालीवर अवलंबून आहे. या तालुक्यात प्रत्येक शासकीय कार्यालयात काम करणारे ९० टक्के अधिकारी व कर्मचारी बाहेरून येणे-जाणे करतात. त्यांचे अपडाऊन रेल्वे वेळापत्रानुसार होते. कार्यालयीन कामकाज सुध्दा रेल्वे वेळापत्रकावर अवलंबून राहत असते. कर्मचाऱ्यांचा वेळ येण्याजाण्यात जात असल्याने तालुक्यातील जनतेची कामे कधी वेळेवर होत नाही. छोट्याशा कामासाठी गरीब लोकांना आठ दिवस शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. शासकीय कार्यालयामध्ये कर्मचारी नियमित राहात नसून मोकाट फिरत असल्याचे प्रमाण जास्त दिसून येते. यांच्यावर नियंत्रण ठेवणारा कोणी आहे की नाही, असेच सगळयांना वाटत असते. शिक्षणासाठी व आरोग्यसाठी शासनाकडून खूप मोठा निधी खर्च केला जातो. परंतु शिक्षण व आरोग्यासाठी शासनाकडून येणारा निधी कधीही पूर्णपणे लाभार्थ्यांवर खर्च होत नाही. मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळत नाही तर रूग्णांना उत्तम आरोग्यसेवा लाभत नाही. शिक्षण क्षेत्रात नेहमी तालुक्यात सावळागोंधळा सुरू असतो. मोठ्या प्रमाणावर शिक्षक वर्ग शिक्षण कार्य सोडून राजकारणात रस घेतात तर दुसरीकडे पंचायत समितीच्याा शिक्षण विभागातही नेहमी शुकशुकाट असतो. शिक्षणाचा कारभार सतत प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर चालत असतो.प्रभारी अधिकाऱ्याचा प्रभाव कर्मचाऱ्यावर किंवा शिक्षकांवर हवा तेवढा पडत नाही. यातून तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ होण्याच्या मार्गावर आहे. सालेकसा तालुक्याची आरोग्य सेवा पावसाळ्यात कोलमडलेली होती आता आरोग्य सेवेत बराच सधिर झाला आहे. तालुक्यात अनेक घटनांमध्ये वेळेवर औषधोपचार मिळत नसल्याने रुग्णाला आपला जीव गमवावा लागतो. तालुक्यात एक ग्रामीण रूग्णालय व चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. परंतु सर्वच ठिकाणी पुरेशे कर्मचारी व तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे. त्यामुळे रूग्णांना वेळेवर योग्य औषधोपचार मिळत नाही. रिक्त पदे भरण्याच्या बाबतीत अधिकारी व लोकप्रतिनिधीचे सतत दुर्लक्ष राहीले आहे.सालेकसा तालुक्यात रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. अनेक गावे अशी आहेत जिथे आतापर्यंत पक्के रस्ते नाहीत. काही मार्ग एकदा डांबरीकरण झाले, परंतु पुन्हा त्याची दुरूस्ती कधीच झाली नाही. त्यामुळे असे रस्ते मातीत हरवलेले दिसतात. अनेक मार्ग असे आहेत की, ते शासनाच्या रेकॉर्डवर पक्के आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र कच्चे आहेत. नक्षलग्रस्त भागात रस्त्याच्या पाहणीसाठी शासनाचे प्रतिनिधी कधीच जात नाही. टेबलावर सर्व कामे पूर्ण होऊन जातात. याशिवाय पिण्याचे पाणी, सिंचनाची पुरेशी सोय अशा अनेक समस्या सतत भेडसावत असतात. ३० वर्षापुर्वी अस्तित्वात आलेला सालेकसा तालुका विकासाच्या वाटेवर के व्हा येईल? याबाबत कोणीही ठोसपणे सांगायला तयार नाही. ( तालुका प्रतिनिधी)
सालेकसाचा मागासलेपणा केव्हा दूर होणार?
By admin | Updated: October 29, 2014 22:52 IST