गोंदिया : कत्तलखान्यासाठी होणारी विक्री, वैरणाची समस्या व यंत्रसामग्रीचा हव्यास यामुळे जनावरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यात आजारांमुळे मरणाच्या दारी गेलेल्या जनावरांची संख्याही कमी नाही. परंतू गुरांना निरोगी ठेवण्यासह त्यांच्या संख्यावाढीला चालना देणारी पशुवैद्यकीय यंत्रणा मात्र पांगळी झाली आहे. जिल्ह्यात आजच्या स्थितीत १९ हजार गुरांमागे केवळ एक पशुवैद्यकीय अधिकारी असे प्रमाण आहे. त्यामुळे गुरांना आरोग्याबाबत शासन-प्रशासन किती जागरूक आहे याची कल्पना येते.जिल्ह्याभरात १०२ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची ६८ पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी २१ रिक्त असल्यामुळे केवळ ४७ डॉक्टरांवरच कारभार चालत आहे. एकूण ८ लाख ९२ हजार ७२७ गुरांचे आरोग्य हे ४८ डॉक्टर कसे सांभाळत असतील याची कल्पनाच केलेली बरी.सन २००७ च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात गाय वर्गात ३ लाख ८८ हजार ५३०, म्हैस वर्गातील १ लाख १ हजार ६३४, शेळ्या वर्गातील १ लाख ५९ हजार ३१०, मेंढ्या २०, कोंबड्या ३ लाख ७ हजार ८९०, डुकरे ३ हजार ८८७, तर २६ घोडे होते. मात्र सन २०१२ च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात गाय वर्गातील ३ लाख ३४ हजार ६७२ जनावरे आहेत. म्हैस वर्गातील ८९ हजार ५६४ जनावरे, शेळ्या वर्गातील १ लाख ५५ हजार ८०६ तर मेंढ्या वर्गातील ९३५ जनावरे आहेत. ५ वर्षाची तुलना पाहता ५३ हजार ८५८ गायी आणि १२ हजार ७० म्हैस वर्गातील जनावरे कमी झाली आहे. ५ वर्षात ६५ हजार ९२८ जनावरे कमी झाली आहेत. एकीकडे माणसांची लोकसंख्या वाढत आहे, मात्र दुभत्या जनावरांची संख्या कमी होत असल्याने दुधात भेसळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.जनावरांना विशेष करून पावसाळ्यात घटसर्प, एकटांग्या, तोंडखुरी, पायखुरी, शेळ्यांना आंतर विषार व पिपीआर असे आजार होतात. या आजारांवर आळा घालण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे जिल्ह्यातील सर्व दवाखान्यांना ३ लाख ९० हजार लसींचा पुरवठा करण्यात आला. जनावरांची घटती संख्या पाहून पशुसंवर्धन विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. अनुसूचित जातीच्या व जमातीच्या व्यक्तींना दुधाळू जनावरांचे वाटप केले जातो. दुधाळू जनावरांना खाद्य पुरवठाही केला जातो. संकरीत वासरांना खाद्यान्न वाटप केले जाते. अनुसूचित जाती/जमातीच्या लोकांना शेळ्या व तलंगाचे वाटप केले जाते. शेतकऱ्यांनी जनावरांचे संवर्धन करावे, यासाठी जिल्ह्यातील १६४० शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागातर्फे प्रशिक्षण देण्यात आले आहे. वैरण विकास कार्यक्रमांतर्गत ७४ लोकांना कडबाकुटी यंत्र, तर १८ जणांना मुरघास युनिट वाटप करण्यात आले आहे. मुर्रा जातीचे वळू व म्हैस १२ वाटप करण्यात आले आहे. नावीन्यपुर्ण योजनेंतर्गत ५२ लोकांना दुधाळू जनावरे तर ७१ लोकांना शेळी वाटप करण्यात आले. कृत्रीम रेतनाचे काम वाढविण्यासाठी यावर्षी ५५ सेवा देणारे कृत्रीम रेतनकेंद्र जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)
जिल्ह्यात १९ हजार गुरांमागे एक पशुवैद्यकीय अधिकारी
By admin | Updated: June 23, 2014 23:57 IST