काचेवानी : मागील वर्षी आम्रवृक्षांना बहर अत्यल्प प्रमाणात आल्याचे दिसत होते. बाजारात गावराणी आंब्यांचे प्रमाण खूपच कमी होते. शहरी ते ग्रामीण भागातील ९० टक्के लोकांना चाखायलासुद्धा आंबे मिळाले नव्हते. यावर्षी सर्वच आम्रवृक्षांना बहर दिसून येत होते. मात्र अवकाळी पावसाच्या तडाख्याने आम्रवृक्षांचा बहरच पूर्णत: झडून गेला आहे. तसेच दोन दशकांत आम्रवृक्षांची संख्याही झपाट्याने कमी झाल्याचे दिसून येत आहे.आम्रवृक्षांचा मोहोर पाहून यंदा खूप आंबे चाखायला मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र निसर्गाला हे मान्य नव्हते. होळीच्या चार दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी पावसाने तिरोडा तालुक्याला झोडपले. त्यात ८० ते ९० टक्के बहर नष्ट झाल्याने आंब्याचे फळ मिळतील की नाही, अशी समस्या निर्माण झाली आहे.गेल्या दोन-तीन दशकांची तुलना केली तर गावरान आमृवृक्षांची संख्या अर्ध्यापेक्षा कमी झालेली आहे. तसेच उत्पादनातही घट झालेली आहे. गेल्या वर्षी गावरान आंबे ९० टक्क्यांच्या वर लोकांना चाखायलासुद्धा मिळाले नव्हते. पूर्वीच्या काळात हवे त्या प्रमाणात आंबे मिळत नसले तरी काही लोकांना मिळायचे. मात्र आजघडीला आंब्याचा बहर पाहून सर्वांना आंबे चाखायला मिळतील, असे वाटत होते. परंतु होळीच्या पूर्वी आलेल्या आणि सध्या चार-आठ दिवसांच्या अंतराने येणारे अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण तसेच गारपिठीने आमृवृक्षाला फळ राहणार की नाही, अशी समस्या निर्माण झाली आहे.तिरोडा तालुक्यात अतिवृष्टीने ९० टक्के आंब्याचा बहर नष्ट झालेला आहे. दहा टक्के उरलेला होता किंवा फळे लागली होती, ती आताच्या अवकाळी पावसाने आणि वादळाने नष्ट होत आहेत. त्यामुळे आंब्याचे रसास्वादन कठिण होणार आहे. यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने प्रत्येक ठिकाणी नासाडीचा सामना जनतेला करावा लागत आहे. (वार्ताहर)रबी पिकाची नासाडीसन २०१४-१५ या आर्थिक वर्षात रबी हंगामाची पिके एकूण ७२३५-८० हेक्टरात घेण्यात आले. यात तृणधान्य गहू ४०७.८० हेक्टर, कडधान्य हरभरा ९५७.८० हेक्टर, लाखोळी ३,६९० हेक्टर, पोपट १९१ हेक्टर, जवस ९८२१, मोहरी व इतर ७.९० हेक्टर आणि भाजीपाला २४०.४० हेक्टरमध्ये घेण्यात आले. मात्र अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे ८० ते ९० टक्के पीक जमिनीला अर्पण झाले. गव्हाचे पीक ६० ते ७० टक्के, हरभरा, लाखोळी, जवस आणि मोहरी १०० टक्के तर पोपट व भाजीपाला ८० टक्केच्या वर नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. कवेलूंच्या घरात राहाणे कठीणग्रामीण भागातील नागरिक वानर व डुकरांच्या त्रासाने त्रस्त झाले आहेत. डुक्कर आणि वानरांनी शेत शिवारातील वस्तुंची नासाडी केली. त्याचबरोबर वानरांनी घरच्या छताची व कवेलूंची नासाडी केल्याने नागरिक उन्हाळ्यात घर छावणीच्या तयारीत असताना आता अवकाळी पावसाने झोडपणे सुरु केले आहे. त्यामुळे पक्क्या सिमेंटची घरे वगळता कवेलूंच्या घरात राहणे कठिण झाले आहे.उन्हाळी भात पिकाला बसणार फटकाउन्हाळी धान पिकात घट येणार आहे. उन्हाळी भात पिकाची लावणी जेमतेम सुरु झाली असून काही ठिकाणी पूर्ण झालेली आहे. उन्हाळी धान पिकाला खुले वातावरण निरभ्र आकाशाची गरज असते. मात्र या वेळी अंतराने होत असलेल्या अवकाळी पावसाने आणि ढगाळ वातावरणाने भात पिकाला गंभीर धोका होणार असल्याचे शेतकरी बोलत आहेत. अशीच समस्या असली तर नशिबाला फुटके खापरच लागणार असल्याचे शेतकरी बोलून दाखवित आहेत.
दोन दशकात आम्रवृक्षांची संख्या निम्म्याने घटली
By admin | Updated: March 27, 2015 00:38 IST