केशोरी : आधुनिक काळात संगणक शिक्षणाला अधिक महत्व आले आहे. शाळा असो की कार्यालय असो संगणकाशिवाय कोणतेच काम होत नाही. बँकेतदेखील लिपिकांच्या हातातील पेन संगणकामुळे दिसेनासे झाले आहे. बदलत्या काळात स्पर्धेमध्ये टिकायचे असेल तर संगणक शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे शहराबरोबर आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी हेरल्यामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा कल संगणक शिक्षणाकडे वाढल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टय़ा लागल्यानंतर संगणक शिक्षण घेण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांंनी मामाच्या गावाला जाण्याऐवजी संगणक संस्थेकडे धाव घेवून संगणक शिक्षण घेणे सुरू केले आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आकाश ढेंगणे वाटायला लागले आहे. काही विद्यार्थी उन्हाळी सुट्टय़ांचा उपयोग संगणकाचे ज्ञान मिळविण्यासाठी करीत आहेत. सर्वच प्रकारचे कार्य संगणक अधिक गतीने व बिनचूक करत असल्याने बँक, प्रेस, रिझर्व्हेशन काऊंटर, संरक्षण खाते, हवाई जहाज, शाळा, महाविद्यालय आणि सर्व प्रकारच्या कार्यालयातील व्यवहार संगणकावर चालत आहेत. संगणक प्रशिक्षणाला अत्यंत महत्व आले आहे. काही विशिष्ठ कंपन्यामध्ये किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये संगणकाचा उपयोग होताना दिसत होता. परंतु अवघ्या १0 वर्षात परिस्थिती एवढी बदलली की रस्त्यावर चालताना हॉटेल, दुकानातही संगणक दिसत आहे. शाळा व महाविद्यालयामधून संगणकाचे विषय शिकविले जातात. संगणकाच्या लोकप्रियतेमुळे सर्व शासकीय कामकाज संगणीकृत झाल्याने प्रत्येक कर्मचार्यांना संगणकज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे पहिल्या वर्गात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांपासून पदवीधर विद्यार्थ्यांंपर्यंंत संगणक शिकणे अनिवार्य आहे. त्यामुळे शहराप्रमाणेच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांंचा कल संगणक शिक्षणाकडे वळला आहे. (वार्ताहर)
आदिवासी विद्यार्थ्यांचा कल संगणक शिक्षणाकडे
By admin | Updated: June 8, 2014 23:58 IST