लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथील मालगुजारी तलावाची निर्मिती शेतीचे सिंचन व पिण्यासाठी पाणी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली होती. गेल्या ४५० वर्षापासून या तलावात लाखो टन गाळ साचला आहे. आतापर्यंत या तलावाचे खोलीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे या वर्षी तलावात मृत साठाच उपलब्ध होता. त्यामुळे नवेगावबांध व परिसरातील गावात पाण्याचा उपसा झाला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट उद्भवले होते. गेल्या तीन वर्षापासून सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे खरीप व रब्बी हंगामापासून शेतकरी वंचित राहिले आहेत. या माजी मालगुजारी तलावाचे खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी नवेगावबांधवासी व निस्तार हक्क पाच गावातील रहिवाशांनी ग्रामसभेतून केली आहे.येथील तलाव १८ व्या शतकात सात पर्वतांच्या मधल्याभागात कोलू उर्फ कवळू पाटील डोंगरवार यांनी सिंचनासाठी तयार केले होते. या तलावाच्या बांधकामाचे अपूर्ण राहिलेले काम नवेगावबांधचे मालगुजार व कवळू पाटलाचे पूत्र सिताराम पाटील डोंगरवार यांनी त्यांच्या निधनानंतर पूर्ण केले. हा तलाव ६२५ मीटर लांब व ११.६० मीटर उंचीचा आहे. उपयुक्त साठवण क्षमता २९.५९७ दलघमी आहे. या तलावाच गट क्रमांक १२९२ असून याची आराजी १२२७.६६ हेक्टर आर एवढी आहे. हा तलाव ४५० वर्षे पूर्वीचा असून १९५६ मध्ये मध्यप्रदेश शासनाकडून महाराष्टÑ शासनाला हस्तांतरीत करण्यात आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र ५६९८ हे.आर. असून १०००.३४ हे.आर. बुडीत क्षेत्र आहे. यापैकी ८२४ हेक्टर आर सध्या उपलब्ध क्षेत्र आहे. १७७० हेक्टर आर. लगतच्या जंगलातून या तलावात गाळ वाहून येत असतो. गेल्या शंभर वर्षांचाच जर विचार केला तर आजघडीला या जलाशयात चार लाख ४२ हजार ५०० घ.मी. गाळ साठला असावा, असा अंदाज गाळ तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.भविष्यात शेतीचे सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर रुप धारण करणार असल्याची भिती नवेगावबांधसह पाच गावातील निस्तार हक्क नागरिक व शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गाळ काढण्याची आवश्यकता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तलावाचे खोलीकरण करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. हे जर केल्या गेले नाही तर तलावाचे अस्तित्वच धोक्यात येण्याची भितीही व्यक्त केली आहे. पाण्याच्या साठ्याबरोबरच येथील तलावाशेजारील पर्यटन संकुलाचा विकास होण्याचा प्रश्नही तेवढाच ज्वलंत आहे.वर्षानुवर्षापासून तलावात गाळ साचला असल्यामुळे तलावातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. मागील चार वर्षापासून या तलावातून कालव्याद्वारे पाण्याचा उपसा होत नसल्यामुळे खरीप व रब्बी हंगामातील पिकाला शेकडो शेतकरी या पाण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा जबर आर्थिक फटका बसला आहे. नवेगावबांध व परिसरातील पाण्याच्या समस्येसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत जैवविविधता समितीची स्थापना केली गेली. यात तक्रारकर्त्यांचाही समावेश होता. पर्यावरण व वन्यजीवांचा कुठलाही तज्ज्ञ नसलेल्या व्यक्तीला समितीत ठेवल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले गेले. पुन्हा तेच झाले. या समितीचा हेतूपुरस्सर आपल्याला हवा तसा अहवाल तयार करुन स्थानिक ग्रामवासीयांशी कसलीही चर्चा न करता सरपंच अनिरुद्ध शहारे बैठकीला नसताना देखील घाईगडबडीत त्यांची स्वाक्षरी घेण्यात आली. नवेगावबांधसह पाच गावांच्या ग्रामसभेचा कोणताही ठराव नसताना त्यांच्याशी चर्चा न करता या पाच गावतील नागरिकांच्या निस्तार हक्कांचा विचार न करता तलावाचे खोलीकरण व पर्यटन संकुलात विकासकामे करण्यात येऊ नये असा अहवाल वन्यजीव व वनविभागाने तयार करुन तलावाला संरक्षीत क्षेत्र घोषित केले हे नियमबाह्य आहे, असा आरोप फाऊंडेशनने केला आहे.
तीन वर्षापासून मिळत नाही तलावातील पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 06:00 IST
भविष्यात शेतीचे सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर रुप धारण करणार असल्याची भिती नवेगावबांधसह पाच गावातील निस्तार हक्क नागरिक व शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गाळ काढण्याची आवश्यकता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तलावाचे खोलीकरण करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. हे जर केल्या गेले नाही तर तलावाचे अस्तित्वच धोक्यात येण्याची भितीही व्यक्त केली आहे.
तीन वर्षापासून मिळत नाही तलावातील पाणी
ठळक मुद्देरब्बी हंगामापासून शेतकरी वंचीत । खोलीकरण करण्याची पाच गावांची मागणी