गोंदिया : कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी शाळा बंद करण्यात आल्या, परंतु शाळेतील १ लाख ९ हजार ८१५ विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनाचा पोषण आहार शाळेत न शिजविता मुलांना वाटप करून त्यांना घरी नेण्यास सांगण्यात आले. काेरोना संसर्गाला रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्स ठेवून हा शालेय पोषण आहार वाटप करण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील शहरी भागात ८ हजार ६०८ विद्यार्थी तर ग्रामीण भागातील १ लाख ५६३ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार वाटप करण्यात आला. कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शिजवून देऊ नका. त्यांना अन्न-धान्य वाटप करा, अशा सूचना केल्या होत्या. या संदर्भात शिक्षणाधिकारी यांनी शाळांना सूचना दिल्या आहेत.
शाळा स्तरावर प्राप्त तांदूळ व धान्यादी वस्तू सुस्थितीमध्ये ठेवावे. शाळास्तरावर तांदूळ व धान्यादी वस्तू प्राप्त झाल्यानंतर मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समिती यांनी सदर तांदूळ व धान्यादी वस्तुवाटपाचे नियोजन करावे, पुरवठादाराकडून शाळांना शाळा स्तरावर प्राप्त होणाऱ्या तांदूळ, मूगडाळ आणि मटकीचे वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर करूनच स्वीकारावे, प्रत्यक्ष माल स्वीकारताना शालेय व्यवस्थापन समिती, पालक, आहार शिजविणारी यंत्रणा, बचत गट, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्यापैकी एक आणि शाळेचे मुख्याध्यापक/ शिक्षक यांच्या समक्ष वजन करावे, प्रत्यक्षात वजन केलेल्या मालानुसारच संबंधित शाळेतील मुख्याध्यापकाची पोहोच पुरवठादारांना देण्यात यावी.
बॉक्स
टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव विचारात घेऊन शाळेमध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन टप्प्याटप्प्याने विद्यार्थी, पालकांना शाळेमध्ये बोलावून तांदूळ व धान्यादी वस्तूचे विहित प्रमाणात वाटप करावे, धान्यादी वस्तू व तांदूळ सुट्या स्वरूपात वितरित करण्यात येत असल्याने धान्यादी वस्तू व तांदूळ घेण्यासाठी कापडी पिशवी गोणीसोबत आणण्याबाबत विद्यार्थी पालकांना सूचित करण्यात आले. तांदूळ व धान्यादी मालाच्या वाटपाकरिता स्वयंपाकी/ मदतनीस यांची मदत घेण्यात आलीे. वाटप करण्यात आलेल्या तांदूळ व धान्यादी वस्तूची नोंद शाळा स्तरावर ठेवण्यात आली.
कोट
कोरोनाचा विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी शाळेत अन्न शिजवून न देता, विद्यार्थ्यांना सरळ अन्नधान्य वाटप करा, असे शासनाच्या सूचना असल्याने शासनाच्या सूचनेनुसार अन्नधान्य वाटप करण्यात येते. फिजिकल डिस्टन्स ठेवूनच धान्यपुरवठा करण्यात येते.
जयप्रकाश जिभकाटे, लेखाधिकारी शालेय पोषण आहार
........
जिल्ह्यातील पोषण आहार लाभार्थी - १,०९,८१५
शहरी लाभार्थी - ८,६०८
ग्रामीण लाभार्थी - १,००,५६३