अधिकाऱ्यांची गरज: मुख्याध्यापकांना काढाव्या लागतात चकरागोंदिया : मागील वर्षभारापासून माध्यमिक शिक्षण विभोाला शिक्षणाधिकारी किंवा उपशिक्षणाधिकारी नाही. तसेच वर्ग २ चे अधिक्षक किंवा लिपीक नसल्यामुळे हे कार्यालय पोरके झाले आहे. या कार्यालयात कामासाठी जिल्ह्यातील ८० ते ९० किमी अंतरावरून येणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांना काम न होताच परत जावे लागते. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात मागील एक वर्षापासून कायम स्वरूपी शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी नाहीत. विस्तार अधिकारी भंडारा व गोंदियाच्या कारभार सांभाळत होते. परंतु त्यांना गोंदिया गटशिक्षणाधिकारी म्हणून पदभार देण्यात आल्यामुळे ते ही पद रिक्त आहे. येथील विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले चंद्रिकापुरे यांना काही दिवसापूर्वी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केल्यामुळे त्यांची ही जागा रिक्त आहे. अधिक्षक या पदावर वर्ग २ चे अधिकारी हवेत. मात्र तालुका समादेशक कावळे यांच्यावर अधिक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विज्ञान पर्यवेक्षक नाहीत. परिचराचे पद ही मंजूर नाही. मनुष्यबळाच्या अभावामुळे जिल्ह्यातील ८० ते ९० किमी अंतरावरून येणाऱ्या मुख्याध्यापक किंवा लिपीकांना काम न करताच परत जावे लागते. अधिकारी नसल्यामुळे शिक्षण मंडळाचे काम प्रलंबित आहेत. इयत्ता १० वी व १२ वीचे परीक्षा फार्म भरायचे आहेत. वर्धीत मान्यतेची गरज आहे. परंतु वर्धीत मान्यता न मिळाल्यामुळे ११ वीच्या १ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश थांबला आहे. नैसर्गिक वाढ तुकडी व मंडळ सांकेताक ही प्रकरणे अडलेली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा कारभार प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला. परंतु त्यांच्यावर कामाचा भार असल्यामुळे अनेक कामे माध्यमिक विभागातील होऊ शकली नाही. मुख्याध्यापकांना व लिपीक वर्गांना माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वारंवार चकरा काढाव्या लागतात. (तालुका प्रतिनिधी)अनुभवींना प्रभार द्याप्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांना कामाचा चांगला अनुभव आहे. मात्र प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी त्यांच्याकडून मेहनत होत असल्यामुळे त्यांच्याकडे माध्यमिक विभागातील कामे करण्यास वेळ उरत नाही. त्यामुळे अनेक मुख्याध्यापक व लिपीकांना कार्यालयाच्या चकरा काढताना चपला झिजवाव्या लागत आहेत. शिक्षण विभागात आणखी काही अधिकारी अनुभवी आहेत. किंवा काहींनी कामही केले आहे अश्या व्यक्तींना प्रभार दिल्यास या कार्यालयातील कामे सहजरित्या होतील. कोणतेही प्रकरणे प्रलंबित राहणार नाहीत. याकडे मुकाने लक्ष घालावे.
माध्यमिक शिक्षण विभाग झाले पोरके
By admin | Updated: September 11, 2016 00:21 IST