हुपराज जमईवार - परसवाडातिरोडा तालुक्यातील ग्राम बिहीरीया येथील उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थी संख्या ९८ आहे. यात ४३ मुली व ५५ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शाळेतील संपूर्ण वर्गखोल्या आजही गळत असून विद्यार्थी कसेबसे शिक्षण घेत आहेत. वर्ग १ व २ करिता नवीन इमारत असून तिचे तीन वर्षापूर्वी बांधकाम करण्यात आले. पण अधिकारी व कंत्राटदारांच्या आपसी सेटींग मधून निकृष्ट बांधकाम करण्यात आले. पहिल्याच वर्षी शाळेत विद्यार्थी शिक्षणासाठी असता दुरवस्था आढळली. पावसाळ्यात वर्गखोल्यांतले पाणी शिक्षक बकेटने बाहेर काढत असल्याचे नेहमीचेच चित्र आहे. तर शौचालयाची दुरावस्था झाली आहे. अशात विद्यार्थ्यांना बसने योग्य नाही. पाण्याची सोय आहे, पण विद्युत पंप नसल्यामुळे विद्यार्थ्यांना हातपंपावर जाऊन पाणी प्यावे लागते. यापासून कार्यालय ही सुटले नसून पाणी गळत असल्याने कार्यालयातील दस्तावेज पाण्याने ओले झाले असून कसेबसे कपाटात ठेवण्यात आले आहेत. शाळेत संगणक नाही. वाटर फिल्टर शासनाने दिले पण तेही खराब पडून आहे. याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार करण्यात आली पण तेथील अधिकारी व कर्मचारी व्यस्त असल्याने त्यांना ही बाब महत्वाची वाटत नसल्याने कुणीही याकडे फटकून बघितले नाही. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सी.एल.पुराम यांनी शाळेची व्यथा लोकमतपुढे मांडली. सहा खोल्या असून त्यात कार्यालयाचा समावेश आहे. यातील पाच खोल्या गळत असल्यामुळे बसण्या योग्य नाही. शौचालयात तर पाय ठेवणे कठीण आहे. मात्र उपाय नसल्याने नाक दाबून व डोळे मिटून सहन करायची सवय करावी लागत आहे. त्यातही पावसाळ्यात तर सांगणे कठीण आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीला सांगण्यात आले. मात्र त्यांचेही याकडे लक्ष नाही. शासनाकडून वर्षाकाठी १२ हजार रुपये मिळतात. त्यात वीज बिल होते. अशात इतर खर्च करायचे कसे असे त्यांनी लोकमतला सांगितले.
बिहीरीया येथील शाळेला लागली गळती
By admin | Updated: August 8, 2014 00:02 IST