अर्जुनी-मोरगाव : गटविकास अधिकारी विलास निमजे यांनी बोलाविलेल्या सभेत कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने पेन्शनर कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढा, अशी मागणी करीत त्यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले.
निवेदनात, दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी पेन्शन अदालत सभेचे आयोजन करण्यात यावे, सेवानिवृत्त मागासवर्गीय कर्मचारी, शिक्षक व अधिकाऱ्यांचे उपादान, अंशराशीकरण, रजा रोखीकरण, गटविमा, भविष्य निर्वाह निधी, प्रवास भत्ता बिल व इतर वेतन भत्ते तातडीने देण्यात यावे, सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका व मदतनिसांना तातडीने एकरकमी पेन्शन देण्यात यावी, सेवानिवृत्तांचा सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता व दुसरा हप्ता रोखीने देण्यात यावा, सेवानिवृत्तांना तातडीने ओळखपत्र देण्यात यावे, सेवानिवृत्त कर्मचारी कार्यालयात कामानिमित्त आल्यावर त्यांना सन्मानजनक वागणूक देण्यात यावी आदी मागण्या नमूद आहेत. तर सेवानिवृत्त पदवीधर शिक्षक ओ. जे. वासनिक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक हिरालाल लांडगे, सेवानिवृत्त शिक्षिका लीलाबाई शहारे, मृत परिचर भागवत सांगोळे यांची पेन्शन केस मंजुरी, सेवानिवृत्त अंगणवाडी मदतनीस मृत स्नेहलता गोपाल लाडे यासह अनेक कर्मचाऱ्यांच्या समस्या पेन्शन अदालत सभेत मंजुरीसाठी महासंघाद्वारे ठेवून चर्चा करण्यात आली. यावर सर्व समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी निमजे यांनी दिले. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आली असून याप्रसंगी सभेला सहायक प्रशासन अधिकारी डी. एस. लोहबरे, विस्तार अधिकारी निखारे उपस्थित होते.