ठिकठिकाणी धान केंद्र सुरू : सातबारा, आधारकार्ड व बँक खाते पुस्तिका आणावीगोंदिया : जिल्ह्यात अनेक ठिकाणी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. दिवाळी सणापूर्वी धान खेरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.सालेकसासहकारी भात गिरणी सालेकसा येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन आ. संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. मार्केटिंग फेडरेशन मुंबई लिमिटेड शाखा गोंदियाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या धान खरेदी केंद्राना सुरू करण्यासाठी आ. संजय पुराम यांनी शासन दरबारी मागणी रेटून धरली होती. त्या मागणीची शासनाने दखल घेत शेतकऱ्यांच्या हितार्थ दिवाळीपूर्व सुरू करण्याचे आदेश दिले. दिवाळीपूर्व धान खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळेल, असा विश्वास निर्माण झाला आहे. खरेदी केंद्रावर धानाची आवक लगेच सुरू झालेली दिसत आहे. संस्थेचे अध्यक्ष व माजी पं.स. सभापती बाबुलाल उपराडे यांच्या अध्यक्षतेखाली आ. पुराम यांनी काटापूजन करुन धानाची मोजणी करीत शुभारंभ केला. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष परसराम फुंडे, रोहयो अध्यक्ष खेमराज लिल्हारे, भाजप महामंत्री राजेंद्र बडोले, महामंत्री मनोज बोपचे, जिल्हा भाजप सचिव दिनेश शर्मा, पं.स. सदस्य प्रतिभा परिहार, माजी पं.स. सदस्या संगिता शहारे, गुणवंत बिसेन, मुलचंद गावराने, मेहतर दमाहे, मनोज इळपाते, नायब तहसीलदार बारसागडे, पुरुषोत्तम चंदनकर, डिल्लू तिवारी व मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग उपस्थित होता. कोटजमुरा येथील धान खरेदी केंद्रसुद्धा लवकर सुरू करण्यात येईल, अशी माहिती आमदार पुराम यांनी दिली. गोठणगाव आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व आदिवासी विकास उपप्रादेशिक प्रकल्प कार्यालय नवेगावबांध यांच्या संयुक्त विद्यमाने धान खरेदी केंद्राचे उद्घाटन संस्थेच्या कार्यालयात (दि.२४) ला करण्यात आले. या वेळी माजी संस्थाध्यक्ष नवाजी राणे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्मित संस्थाध्यक्ष सिगु कोवे यांनी धान खरेदी केंद्राच्या वजन काट्याचे पूजन केले. माजी संस्था उपाध्यक्ष गोपिनाथ दरवडे, संचालक दिगांबर कन्हाके, देवराम हलमारे, शालीक कुंभरे, जयदेव मेश्राम, श्रीराम उईके, हरिश्चंद्र देव्हारी, भिवा मलगाम, कुसुमबाई प्रत्येकी, विपणन निरीक्षक वासनिक, ग्रेडर करौथी, केंद्रप्रमुख रोषण राऊत, संस्थेचे व्यवस्थापक वाय.जी. हलमारे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम मयाराम कोडापे यांचे धान मोजण्यात आले. पहिल्या दिवशी १७ क्विंटल धानाची खरेदी केली. शेतकऱ्यांनी धान विक्रीकरिता येताना सोबत सातबारा, आधार कार्ड व सहकारी बँकेच्या खाते पुस्तिकांची झेरॉक्सप्रत सोबत आणावे व शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावरच धानाची विक्री करावी, असे आवाहन संस्थाध्यक्ष सिंगू कोवे यांनी केली. साखरीटोला आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित (नो.क्र.१०४७) सातगाव-साखरीटोला संस्थेंतर्गत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या वेळी सहकारी संस्थेचे अध्यक्ष हिरालाल उईके, संचालक राजू काळे, बाळाराम मडावी, विनोद दोनोडे, प्रभू थेर, भैयालाल लिंदराम, उमा औरासे, संतोष मडावी, सदाराम दोनोडे, प्रभाकर दोनोडे, तुलशीराम शहारे, लक्ष्मी शहारे, मुंगुना भलावी, हिरामन कावरे, चुन्नीलाल शहारे उपस्थित होते. धान खरेदी तराजूचे पूजन करण्यात आले. लगेच प्रल्हाद मेंढे या शेतकऱ्यांचे धान खरेदी करुन धान खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी होती. त्यासाठी आमदार संजय पुराम यांनी धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी परिसरातील शेतकऱ्यांची सूचना केली होती. त्यांनी पाठपुरावा केल्याने येथील केंद्र लवकर सुरू करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. संचालन सचिव रामेश्वर बहेकार यांनी केले. कार्यक्रमसाठी किशोर चिंधालोरे यांनी सहकार्य केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करासोनपुरी : तालुक्यातून आठ किलोमीटरवर सोनपुरी हे मोठे गाव आहे. परिसरात मुख्य पीक म्हणून धान पीक घेतला जातो. तरी सोनपुरी परिसरात एकही शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र नाही. या परिसरातील लोकांना नाईलाजास्तव खासगी धान खरेदी केंद्रात कमी भावात धान विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे . महाराष्ट्र शासनाने काढलेल्या शासन निर्णयानुसार हंगाम ३१ मार्च २०१६ पर्यंत आणि रबी हंगाम १ मे २०१६ ते ३० जून २०१६ पर्यंत निर्धारित केलेले धानाचे दर प्रति क्विंटल ‘ए’ ग्रेड धानासाठी १५१० रुपये तर साधारण ग्रेडसाठी १४७० रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. तरी सोनपुरी परिसरात हलक्या धानाला ११०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे धान घेत आहेत. तरी धानाला २५०० रुपये प्रति क्विंटल भाव देवून धान खरेदी केंद्र उघडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .
खरेदीमुळे शेतकऱ्यांना दिलासा
By admin | Updated: October 26, 2016 02:34 IST