केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी हे परिसर जंगलव्याप्त असून बहुगुणी व कल्पवृक्ष म्हणून ओळखली जाणारी मोहवृक्षाची झाडे फार मोठ्या प्रमाणात आहेत. वसंत ऋतूमध्ये मोहवृक्षाला फुले येतात. या मोहफुलाच्या माध्यमातून अनेक गरीब कुटुंबांना रोजगाराची संधी उपलब्ध होत असते. या मोहफुलापासून त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो. सध्या मोहफुल वेचण्याचे काम जोरात सुरु आहे. त्यासाठी भल्या पहाटे घनदाट जंगलात जाऊन मोहफुले वेचावी लागतात. मात्र यावर्षी वेळोवेळी बदलणाऱ्या हवामानामुळे मोहफुलांना आवश्यक असणारे वातावरण मिळत नसल्यामुळे मोहफुल खाली पडण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे मोहफुलाच्या उत्पन्नात विक्रमी घट होत असल्याचे दिसून येत आहे.
दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात या परिसरातील मोहफुलाचा हंगाम एक महिन्यापर्यंत सुरु असतो. मोहफुलाच्या हंगामावर अनेक गरीब कुटुंब अवलंबून असतात. दररोज भल्या पहाटे उठून मोहफुल वेचण्यासाठी दाट जंगलात जातात.जंगलात पडलेली मोहफुले कोणीही वेचू नये म्हणून अधिक पहाटे जंगलात जाण्याची स्पर्धा सुरु असते. यामध्ये जीवहानी होण्याची शक्यता असते. काही लोक मोहफुलवृक्षाच्या खाली स्वच्छ जागा राहावी म्हणून मोहवृक्षाच्या खालील पालापाचोळा जाळून जागा मोहफुल वेचण्यासाठी सुलभ करुन ठेवतात. परंतु यामुळे जंगलात वणवा लागून मौल्यवान वनसंपत्ती जळण्याची दाट शक्यता असते. याकडे वनविभागातील लहान कर्मचाऱ्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत लक्ष ठेवून असतात. सध्या आता अनेक कुटुंब मोहफुले वेचण्याच्या व्यवसायात गुंतलेले दिसून येत आहेत. अशाच काही मोहफुले गोळा करणाऱ्या व्यक्तीची प्रत्यक्ष भेट घेतली असता त्यांनी आपली दररोजची आपबिती सांगून यावर्षी मोहफुलाला पोषक वातावरण नसल्यामुळे मोहफुलात विक्रमी घट निर्माण झाल्याचे सांगितले. मोहफुल कमी पडत असल्यामुळे जंगलात लांब दूरपर्यंत जाऊन मोहफुल गोळा करण्याची पायपीट करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.