गोंदिया : वृत्तपत्रांमुळे कोरोना होतो हा केवळ भ्रम आहे. खोट्या अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी बिनधास्तपणे वृत्तपत्र घरी बोलावून वाचन करावे. वृत्तपत्रांमुळे कोरोना होतो हा केवळ भ्रम आहे असे मत आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना हा वृत्तपत्रांमुळे होत नसल्याचे आधीच स्पष्ट केले. वृत्तपत्रांमुळे कोरोनाची लागण होत नसून वृत्तपत्र पूर्णपणे सुरक्षित व कोरोनामुक्त आहे. वृत्तपत्रांच्या छपाई दरम्यान त्यांचे सॅनिटायझेशन केले जाते. वृत्तपत्र विक्रेते देखील सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाही. कोरोनाशी युद्ध लढतांना स्वत:चा बचावही करायचा आहे. त्यामुळेच वाचकांनी मनात कुठलीही शंका न बाळगता वर्तमानपत्राचे वाचन करावे.
..........
मी नियमित वर्तमानपत्राचे वाचन करून अचूक बातम्यांची माहिती करून घेतो. कोरोनाशी युद्ध लढतांना भीती नको, सजगता हवी. हात वारंवार साबणाने धुवावेत. तोंडाला मास्क बांधावे. विनाकारण घराबाहेर पडू नये. शारीरिक अंतर ठेवूनच दैनंदिन कामे करावीत. शासनाने वारंवार दिलेल्या सूचनांचे पालन करावे. गर्दीत जाऊ नये किंवा गर्दी करू नये. कोरोनाला सर्व मिळून हरवूया.
- डॉ. पिंकू मंडल, वैद्यकीय अधिकारी, केशोरी.
फिजिकल डिस्टन्स न ठेवल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होतो. कोरोनाच्या काळातही सेवा देणारे वृत्तपत्र अत्यावश्यक सेवेत मोडते. जगभरात आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची अचूक माहिती वर्तमानपत्रे देतात. कोरोना सोबत लढताना अफवांवर विश्वास ठेवू नये. जागरूक व सतर्क रहा. तोंडाला मास्क बांधा. नियमित वृत्तपत्र वाचून सत्य बातम्या जाणून घ्या. मनात कुठलीही भीती न बाळगता वृत्तपत्रांचे वाचन करावे.
- डॉ. अमित खोडणकर, वैद्यकीय अधिकारी सातगाव.
समाजातील घडामोडींचे वास्तव चित्रण मांडणारे वृत्तपत्र हे जीवनावश्यक यादीत आले आहेत. प्रिंट होऊन बाहेर पडणारे वृत्तपत्र हे सॅनिटाईज करूनच बाहेर येते. त्यामुळे वृत्तपत्रांमुळे कोरोना झाल्याचे ऐकिवात नाही. सोशल मीडियाच्या बातम्यांमुळे फेक बातम्या या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आम्ही सोशल मीडियाकडे दुर्लक्ष करतो. विश्वासार्ह बातम्या वृत्तपत्रांमधूनच मिळत आहेत. त्यासाठी सर्वांनी बिनधास्तपणे वृत्तपत्र वाचावे.
- डॉ. सुषमा देशमुख, वैद्यकीय अधिकारी भानपूर.
पेपर छापताना सॅनिटायझरची फवारणी केली जाते. निर्जंतुकीकरण झालेल्या वृत्तपत्रांमुळे कोरोना होतो हा केवळ भ्रम आहे. सोशल मीडियामुळे पसरणाऱ्या अफवांवर आळा बसण्यास मदत होते. वृत्तपत्रच सत्य माहिती देणारे आहेत असे समाजमनाला वाटते. वृत्तपत्रांपासून कोरोना होत नाही. कसलाही संकोच व भीती न बाळगता वृत्तपत्र वाचावे.
- एल.यू. खोब्रागडे, महासचिव महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती
समाजजागृतीचे माध्यम असलेल्या वृत्तपत्रांचीच अफवा पसरविण्यात आल्याने काही जणांनी वृत्तपत्र काही काळासाठी बंद केले होते. अनेकांनी आताही वृत्तपत्र सुरू केले नाही. आम्ही नियमित वृत्तपत्र वाचून अचूक बातम्या मिळवतो. सोशल मीडियामुळे अफवांचा बाजार सुरू झाला. परंतु अजूनही १०० टक्के विश्वास वृत्तपत्रांमुळे टिकून आहे. सविस्तर बातम्या वृत्तपत्रातून वाचायला मिळतात.
- कैलास लांडगे, पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती