नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत आठही तालुक्यांत मिळून एकूण ४० प्राथमिक आरोग्य केंद्र चालविले जातात. या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना औषधोपचार पुरविला जात आहे. सध्या व्हायरल फिवरचे वातावरण असून, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दररोज ५०, १०० ते १५० रुग्णांची तपासणी केली जात आहे. ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ग्रामीण व दुर्गम भागात मिळून एकूण २६० प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह शेकडो आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली जाते. शिवाय जननी सुरक्षा योजना, बुडित मजुरी योजना, शिवाय औषधोपचाराच्या विविध योजना राबविल्या जातात. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय आरोग्य सेवा दिली जात आहे.
सर्वाधिक भार स्त्री रुग्णालयावर- गोंदियाच्या बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात वर्षाकाठी ७ हजारावर गर्भवती महिलांच्या प्रसूती होतात. गर्भवती महिलांच्या प्रसूतीचा ९० टक्के भार एकट्या गंगाबाई रुग्णालयावर आहे. - इतर महिला व बालकांचा उपचारसुद्धा महिला रुग्णालयातून केला जाताे. गोरगरीब गर्भवतींसाठी बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय वरदान आहे.
उपजिल्हा रुग्णालय कुटुंब नियोजनात आघाडीवर
- तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालय आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी आघाडीवर असून, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात हे उपजिल्हा रुग्णालय जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आहे. तेथील अधीक्षक डॉ. हिम्मत मेश्राम आणि प्रसूती तज्ज्ञ डॉ. सायास केंद्रे यांच्या मेहनतीमुळे गोरगरिबांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते.