गोंदिया : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने संतापलेले रुग्णांचे नातेवाईक डॉक्टर योग्य उपचार करीत नाही असा आरोप करून डॉक्टरांवर हल्ले करतात. हे हल्ले रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी शुक्रवारी कोविड केअर सेंटर (रुग्णालय)मधील डॉक्टरांसोबत बैठक घेतली. या बैठकीत डॉक्टरांना मदतची गरज असल्यास त्या ठिकाणी पोलीस कसे तत्काळ पोहोचतील यावर चर्चा करण्यात आली.
डॉक्टरांच्या मदतीसाठी डॉक्टर व पोलिसांचा एक ग्रुपही तयार करण्यात आला. कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. उपचाराकरिता शासकीय रुग्णालय तसेच शासनाने मान्यता दिलेले खासगी रुग्णालये येथे कोविड केअर सेंटर्स तयार करण्यात आले आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असताना रुग्ण दगावल्यास किंवा बाधित रुग्णाच्या उपचारासाठी रुग्णालयात बेड उपलब्ध करून न दिल्यास रुग्णांचे नातेवाईक कोविड केअर सेंटरमध्ये गर्दी करून डॉक्टरांना धमकाविणे तसेच मारहाण करण्याचे प्रकार जिल्ह्यामध्ये वाढत आहेत. या प्रकारावर प्रतिबंध घालण्यासाठी २४ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, तिरोडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव, आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, पोलीस उपअधीक्षक (गृह) तेजस्विनी कदम, गोंदिया शहरचे ठाणेदार महेश बन्सोडे, रामनगरचे ठाणेदार प्रमोद घोंगे, नियंत्रण कक्षाचे सुजित चव्हाण, जिल्हा विशेष शाखेचे उध्दव डमाळे उपस्थित होते. कोविड केअर सेंटरमध्ये गर्दी करून डॉक्टरांना धमकाविणे तसेच मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याबाबतच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. पोलीस अधीक्षकांनी प्रत्येक उपविभागस्तरावर त्या त्या उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी त्यांच्या विभागासाठी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून ते स्वतः ग्रुप ॲडमिन असतील. कोविड आजारावर उपचार करणारे सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांतील डॉक्टर्स हे या ग्रुपचे सदस्य राहतील. प्रत्येक उपविभागीय व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पोलीस नियंत्रण कक्ष प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा,पोलीस उप अधीक्षक (गृह) व पोलीस अधीक्षक गोंदिया हे सदस्य असतील.
.....
कोविड केअर सेंटरला दर दोन तासाने भेट
गोंदिया शहरासाठी संबंधित पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस स्टेशनचे गस्त पथक गस्त करेल, त्याव्यतिरिक्त नियंत्रण कक्ष येथील स्ट्राइकिंग फोर्स, वाहतुक शाखेचे प्रभारी अधिकारी संपूर्ण शहरात गस्त घालतील. गस्तीदरम्यान कोविड केअर सेंटर (हॉस्पिटल) ला दर दोन तासांनी भेट देतील. बैठकीत आयएमए अध्यक्ष डॉ. विकास जैन व ३ डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले.
बॉक्स
डॉक्टरांच्या मदतीसाठी हेल्पलाइन
पोलीस नियंत्रण कक्ष येथे डॉक्टरांच्या मदतीसाठी हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला आहे. या हेल्पलाइन नंबरवर येणारे मेसेज पाहण्यासाठी २४ तास नियंत्रण कक्ष येथे पोलीस अंमलदाराची नेमणूक करण्यात येईल. जेव्हा डॉक्टरांना पोलीस साहाय्याची गरज पडेल त्यावेळी डॉक्टरांनी या ग्रुपवर मेसेज करावा तर तो मेसेज वरील सर्व अधिकारी पाहतील. तत्काळ डॉक्टरांना मदत करण्यासाठी नियंत्रण कक्षातून जवळच गस्तीवर असणारे पथक घटनास्थळी तत्काळ रवाना केले जाईल.