आमगाव : धानाला भाव नाही, धान पिकविताना शेतकरी त्रस्त आहे. यावर्षी किडीने पिकांचे नुकसान केले असून दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे. अशात शेतकऱ्यांनी पिक पद्धतीत बदल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी अथर्मंत्री महादेवराव शिवणकर यांनी केले. तालुक्यातील ग्राम धावडीटोला येथे बुधवारी आयोजित ‘जागो किसान’ कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमाला सेवानिवृत्त जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोहर चंद्रीकापुरे, माजी आमदार भेरसिंह नागपुरे, लखनसिंह कटरे, देवचंद तरोने, विद्या खेडीकर, तुकाराम बोहरे, नरेश माहेश्वरी, सिद्ध भट्टी प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना शिवणकर यांनी, पिक पद्धतीत बदल करताना वेळेचे सुद्धा नियोजन करने गरजेचे आहे. त्यामुळे पिकाला योग्य भाव मिळेल. अदरक, मिर्ची, शिमला मिर्ची, केळी, भाजीपाला, वांगे, टमाटर, कारले, गाजर, मुळा पिकामुळे नक्कीच आर्थिक स्थिती सुधारु शकते. ऊसाचे भाव दोन वर्षांपासून मिळाले नसून साखर कारखाने लुटत आहेत. त्याबरोबर शेतीत रासायनिक किटकनाशके व खतांऐवजी सेंद्रीय खतांचा वापर केल्यास रोगापासून नक्की सुटका होऊन उत्पादन खर्च कमी करता येतो. तसेच १०-१० शेतकऱ्यांचे गट करुन उत्पादीत माल थेट बाजारपेठेत गेल्यास उत्पादनाला योग्य भाव मिळेल असे मत मांडले. सिद्धभट्टी यांनी सांगितले की, आर्थिक बाजू पूर्ण करण्याकरिता जैन इरिगेशनच्या सकल बँकेकडून १२ टक्के व्याजाने कर्ज घेऊन शेती सुधारना करता येत असल्याचे सांगत, जैन ड्रिप इरिनेशन पीक पद्धती, कार्य उपलब्धता या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तर चंद्रीकापुरे यांनी, जिल्ह्याचे वातावरण व तापमान योग्य असल्यामुळे ३२ प्रकारची पिके घेता येऊ शकत असल्याचे सांगीतले. याप्रसंगी ग्राहक ते शेतकरी शेतातील माल शेतकऱ्यांचे क्लब स्थापन करुन शहरापर्यंत पोहोचविण्याचे, शिबिरे भरवून शेतकऱ्यांना जागृत करण्याचे ठरले. या कार्यक्रमाला सुमारे २०० शेतकरी सहभागी झाले होते. प्रास्तावीक शेतकरी धनराज हुकरे यांनी मांडले. संचालन सी.जी. पाऊलझगडे यांनी केले. आभार मुन्ना कटरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी संतोष गायधने, सुनील बोळने, ऋषी चुटे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
पीक पद्धतीत बदल गरजेचा
By admin | Updated: January 2, 2016 08:35 IST