आरोप : व्यवस्थापन समिती केली गठितपरसवाडा : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अत्री येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्या मनमर्जीने शासन नियमांची पायमल्ली केली. हिटलरशाहीने १० महिन्याचा कार्यकाल लोटूनही शाळा व्यवस्थापन समिती गठित केली नाही. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकाशी अपमानस्पद वागणूक केल्याची बाब पुढे आली आहे. फेब्रुवारी २०१३ मध्ये शाळा समिती गठित करण्यात आली होती. तिचा कार्यकाल २०१५ फेब्रुवारी होता. दोन वर्षाची मुदत असल्याने जानेवारीमध्ये पालक सभा घेऊन नवीन समिती गठित करणे बंधनकारक होते. पण मुख्याध्यापक व शाळा समितीचे अध्यक्ष यांची साठगाठ असल्याने समिती गठित न करता जुन्याच समितीची पुनर्नियुक्ती करून कार्यकाल वाढवून दिला. हे सर्व नियमबाह्य असून लाखो रूपयांचा आर्थिक व्यवहारही यात झाला आहे.शाळेत व्यायामशाळा, क्रीडांगण सपाटीकरण, वर्गखोलीचे काम समितीमार्फत करण्यात येत असल्याने समितीचा दर्जा व अध्यक्षांच्या सहीने आर्थिक व्यवहार होत असल्याने समितीला अधिक महत्व आले आहे. पालकांनी आक्षेप घेतला असता मुख्याध्यापक अंबुले यांनी ११ डिसेंबर रोजी पालक सभा समिती गठित करण्यासाठी बोलावली. पालकही सभेत आले. पण मुख्याध्यापकाने सत्ताधारी अध्यक्षांच्या दबावाखाली येवून समिती गठित केली नाही. उलट पालकाशी असभ्य वागणूक करून सभा न घेता तुम्हाला वाटेल ते करा, माझा कोणी काहीच करू शकत नाही, अधिकारी व नेते माझे आहेत, तुम्ही घरी जाऊ शकता, मला वाटेल ते करीन, असे म्हणत शाळेतून पसार झाले. गावात मुख्याध्यापक अंबुले यांच्याविरूध्द तणावाचे वातावरण निर्माण झाले. शिक्षक गावात राजकारण करत असून शिक्षणाचे धडे न शिकवता विद्यार्थ्यांना आता मुख्याध्यापक पालकांना राजकारणाचे धडे शिकवित आहे. आता पालकांनी आपली मुले शाळेत न पाठविण्याचा व शाळा बंद करण्याचा पवित्रा घेतल्याचे निलकंठ परिहार, ज्ञानेश्वर बिसेन, राजेश परिहार, बिजेवार व अन्य ५८ पालकांनी सांगितले. मुख्याध्यापक अंबुले व अध्यक्ष बिसेन यांची साठगाठ व समितीला विश्वासात न घेता दहा लाखांच्या जवळपास आर्थिक कामे करून इमारत, क्रीडांगण, व्यायामशाळेच्या कामात भ्रष्टाचार केला आहे. त्याचे पितळ उघडे होऊ नये म्हणून नवीन समिती गठित करण्यात आली नाही, असे पालकांनी लोकमत प्रतिनिधीला सांगितले. सदर मुख्याध्यापक व अध्यक्षावर कारवाई करण्याची मागणी पालकवर्ग गावकऱ्यांनी केली आहे. मुख्याध्यापक अंबुले यांच्याशी संपर्क केला असता समितीचा कार्यकाल संपला असून त्यात आपली चूक झाली. पण समिती ११ डिसेंबर रोजी सरपंच नसल्याने व गावकऱ्यांच्या गदारोळामुळे झाली नाही. यात भ्रष्टाचार आर्थिक व्यवहार नसल्याचे सांगितले. अंबुले, सरपंच माहुरे यांच्याशी संपर्क केला असता मुख्याध्यापक यांनी समितीबद्दल पालकांची सभा घेण्याचे नोटीस दिले. पण हेतुपुरस्कर मुख्याध्यापकांनी सभा पूर्ण होवू दिली नाही. (वार्ताहर)
मुख्याध्यापकाची पालकांशी अपमानास्पद वागणूक
By admin | Updated: December 20, 2015 01:54 IST