लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्याभाेवती कोरोनाचा विळखा हळूहळू घट्ट होत असल्याचे चित्र आहे. शनिवारी (दि. १५) कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने ९४१ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात १६८ नमुने कोरोनाबाधित आढळले तर त्याचा पॉझिटिव्हिटी रेट १७.८५ टक्के होता. बाधितांच्या संख्येत आता तीन आकडी वाढ होत असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात १ ते १५ जानेवारी दरम्यान ११२५ रुग्णांची भर पडली आहे. तर २५० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून सर्वाधिक रुग्ण गोंदिया आणि आमगाव तालुक्यात आढळत आहे. त्यामुळे आरोग्य व जिल्हा प्रशासनाची सुद्धा चिंता थोडी वाढली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण आणि कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. अन्यथा कोरोनाचा विस्फोट होऊन पुन्हा कडक निर्बंधांना सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४८४,९८३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात २५७,६८४ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २२७२९९ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४२३२९ नमुने कोरोनाबाधित आढळले असून, त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ८.८२ टक्के आहे. तर ४०७१० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
पंधरा दिवसात वाढले ११२५ रुग्ण - जिल्ह्यात ३१ डिसेंबरपर्यंत केवळ ३३ कोरोना रुग्ण होते. मात्र १ जानेवारीपासून बाधितांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे रुग्णांचा आकडा सातत्याने फुगतच गेला. १ ते १५ जानेवारी दरम्यान जिल्ह्यात ११२५ बाधितांची नोंद झाली, तर २५० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
केवळ ३० रुग्ण रुग्णालयात जिल्ह्यात सध्या ८०४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून यापैकी ७७४ रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने ते गृहविलगीकरणात आहे. तर ३० रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे.
मृत्यूदर नियंत्रणात - एकीकडे जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी दुसरीकडे बाधितांतील मृतकांचे प्रमाण कमी आहे. मागील पंधरा दिवसांत एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नाही ही जिल्हावासीयांसाठी थोडी दिलासादायक बाब आहे.
मास्कचा करा नियमित वापर - मागील तीन - चार दिवसांपासून जिल्ह्यात दररोज शंभर ते दीडशे बाधितांची भर पडत आहे. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ८०४ वर पोहोचला आहे. संसर्ग वेगाने वाढत असल्याने मास्कचा नियमित वापर तसेच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.