सालेकसा : सालेकसा तालुक्यात अनेक नैसर्गिक व धार्मिक पर्यटनस्थळ अजूनही उपेक्षित आहेत. या स्थळाचा विकास साधण्यासाठी योग्य पाऊल उचलले तर तालुक्यातील बेराजगार युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळतील. यासाठी तालुक्यात वातावरण सुद्धा अनुकुल आहे. मात्र यासाठी या क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी केले. सालेकसा येथे मंगळवारी आयोजित समाधान योजना शिबिरात उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. तालुका प्रशासनाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय समाधान योजना शिबिराच्या अध्यक्षस्थानी आमगाव क्षेत्राचे आ.संजय पुराम, प्रमुख अतिथी म्हणून जि.प. महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, पं.स. सभापती छाया बल्हारे, सहायक पोलीस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय देवरे, सहायक उपवनसंरक्षक अश्विन ठक्कर, आमगावचे तहसीलदार राजीव शक्करवार, उपविभागीय अधिकारी दुर्गेश सोनवाने, देवरीचे तहसीलदार संजय नागरिकर, उपजिल्हाधिकारी व सालेकसाचे तहसीलदार सुनिल सूर्यवंशी, जि.प.सदस्य प्रेमलता दमाहे, कल्याणी कटरे, देवकी नागपूरे, पं.स. सदस्या संगीता शहारे, रुपा भुरकूडे, आमगाव खुर्दचे सरपंच योगेश राऊत, बीडीओ व्ही.यू. पचारे, शासकीय कार्यालयाचे अधिकारी, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत विस्तारीत स्वरुपात समाधान शिबिराचे प्रास्ताविक तहसीलदार सुनिल सुर्यवंशी यांनी केले. यावेळी विविध घडामोडीचा आढावा सादर केला. आ. संजय पुराम यांनी शेतकऱ्यांचा समस्येवर विशेष भर देत त्यांच्या विज, पाण्याचा समस्या कायम स्वरुपी दूर करण्यासाठी उपाययोजना आखण्याची गरज असल्याचे म्हणाले. सौर ऊर्जेचा वापर वाढविण्यावर त्यांनी समयोचित मार्गदर्शन केले. याप्रसंगी २० हजाराचे धनादेश व पाच लोकांना रेशन कार्डचे वितरण आ.संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. या समाधान योजना शिबिरात महसूल विभाग, पंचायत, आरोग्य, कृषी, सिंचन, पर्यटन, वन, शिक्षण, संरक्षण, परिवहन इत्यादी विभागाची मुद्देसूद माहिती व योजना प्रदर्शित करणारे तंबू लावण्यात आले होते. काही ठिकाणी प्रात्याक्षिकाद्वारे योजनाची माहिती देण्यात आली.संचालन प्रा. ममता पालेवार, अश्विन खांडेकर यांनी केले. आभार खंडविकास अधिकारी व्ही.यू. पचारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी नायब तहसीलदार आर.एम. कुंभरे र.टी. शंकुनदनवार, लांजेवार, एस.एम. नागपूरे यांच्यासह मंडळ अधिकारी तलाठी व सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. ( प्रतिनिधी)
पर्यटनातून रोजगार निर्मितीची गरज
By admin | Updated: March 29, 2015 01:53 IST