गोंदिया : काहीही न करणे, मात्र झालेल्या कामावर बोंबा मारणे हे राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही जमले नाही. मात्र ज्या पक्षाच्या पुढाऱ्याने दिशाभूल करून सत्ता काबीज केली त्यांनी आता काय केले, हे सांगितले पाहीजे. मात्र त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीही नाही. भाजप हा पक्ष आणि त्याचे पुढारी बेजबाबदार आणि अविश्वासू आहेत, असा घणाघात करीत विश्वास आणि जबाबदारीने काम करणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच असून जिल्ह्यातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोरेगाव येथे राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेत मंगळवारी ते बोलत होते. यावेळी मंचावर आ.राजेंद्र जैन, माजी आ.दिलीप बन्सोड, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, राकाँचे तालुका अध्यक्ष केवलराम बघेले, माजी पं.स.सदस्य डुमेश चौरागडे, जि.प.सदस्य ललिता चौरागडे, डॉ.श्रीप्रकाश रहांगडाले, राकाँचे शहर अध्यक्ष टेकेश्वर पटले यांच्यासह राष्ट्रवादीचे उमेदवार उपस्थित होते.यावेळी खा.पटेल पुढे म्हणाले, स्व.मनोहरभाई पटेल यांनी जिल्ह्याच्या विकासाची धुरा खांद्यावर घेतली होती. त्याच विकास कामांना गती देण्याचे काम आम्ही सातत्याने करीत आहोत. अदानी प्रकल्प, कवलेवाडा सिंचन प्रकल्प, कटंगी प्रकल्प, कलपाथरी प्रकल्प यासारखी महत्वपूर्ण कामे आपल्या माध्यमातून झाली आहेत. याशिवाय भेलसारख्या प्रकल्पांना मंजुरी देण्याचे काम आपण केले होते. मात्र भेल प्रकल्प भाजपने रखडून ठेवला आहे. यावरून जिल्ह्यातील बेरोजगारांची किती गय होत आहे हे स्पष्ट होते. १८ महिन्यांपूर्वी भाजपच्या पुढाऱ्यांनी अनेक स्वप्न दाखविले. आजच्या पंतप्रधानांनी तर मी खाणार नाही आणि दुसऱ्यांना खाऊ देणार नाही या त्यांच्या कथनाप्रमाणे आज खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाच्या जेवणाच्या ताटातून डाळ हिरावून घेतली आहे. रेशन मिळत नाही. केरोसीन मिळत नाही या सांगण्यासारख्या बाबी राहिल्या नाहीत, असे पटेल म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)तोंडचा घास पळविला- अग्रवालगोंदिया : आम्ही गोरेगाव, सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी व देवरी येथे नेहमीच आम जनतेत जाऊन त्यांच्या भावना समजून घेत त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र भाजपच्या नेत्यांनी सामान्य जनतेच्या थाळीतील खान्याच्या वस्तूही हिरावून घेतल्या आहेत. जे सरकार सामान्य जनतेच्या तोंडातील घास पळविते ते सरकार सामान्य जनतेचे भले कसे करणार? असा सवाल काँग्रेसचे आमदार तथा लोकलेखा समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांनी केला.देवरी व गोरेगाव येथे नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, माजी आ.रामरतन राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे, सहेसराम कोरोटे, डॉ.झामसिंग बघेले, डॉ.योगेंद्र भगत, जगदीश येरोला, डॉ.नामदेव किरसान, जि.प. सभापती पी. जी. कटरे आदींनी मार्गदर्शन करून काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.यावेळी बोलताना आ.अग्रवाल म्हणाले, लोकांसाठी घाम गाळून धान्य उगवणाऱ्या शेतकऱ्यांचेच आज देशात आणि राज्यात हाल होत आहेत. त्यांचेच हे सरकार भले करू शकत नाही तर सामान्य लोकांच्या व्यथा काय समजून घेणार आहेत. राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी सतत आत्महत्या करीत आहेत. मात्र मुख्यमंत्री सहायता निधीमधील पैसा बँकॉकला जाणाऱ्या डान्स ट्रूपला देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळत आहे. अशा धोकेबाज लोकांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली असून त्यासाठी चौफेर विकास करण्यास कटीबद्ध असणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारांनाच विजयी करा, असे आवाहन आ.अग्रवाल यांनी केले. देवरी, गोरेगावचा विकास गोंदियाच्या धर्तीवर केला जाईल, असेही ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)
राष्ट्रवादी व काँग्रेसने केले भाजपला लक्ष्य
By admin | Updated: October 28, 2015 01:57 IST