देवराष्ट्रे : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील यशवंतरावजी चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याचे वनपाल जितेंद्र गुजले यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रविवारी दुपारी पर्यटनासाठी अभयारण्यात आलेल्या तीन युवकांनी अभयारण्यात मोफत प्रवेश देण्याच्या कारणावरून कर्मचाऱ्यांबरोबर चांगलाच धिंंगाणा घातला. या घटनेची तक्रार अर्जाद्वारे चिंचणी-वांगी पोलिसांना देण्यात आलेली आहे. अभयारण्यात रविवारी दुपारच्या सुमारास दुचाकीवरून तीन पर्यटक मद्यधुंद अवस्थेत आले होते. हे पर्यटक अभयारण्यात मोफत प्रवेश देण्याची मागणी करीत कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत होते. ‘हे अभयारण्य कोणाचे आहे, तुम्हाला माहिती आहे का?’ अशी दमबाजी करीत, ‘सायंकाळी पाच वाजल्यानंतर तू अभयारण्याच्या बाहेर ये, तुला जिवंत ठेवत नाही’, अशी धमकी त्यांनी वनपाल गुजले यांना दिली. याबाबत अभयारण्य प्रशासनाकडून चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. (वार्ताहर) माहिती घेऊन कारवाई : सतीश साळे याबाबत सागरेश्वर अभयारण्याचे वनक्षेत्रपाल सतीश साळे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, घटना घडली त्यावेळी मी अभयारण्यात नव्हतो. अशी घटना दुर्दैवी आहे. अभयारण्य परिसरात मद्यपींचा उपद्रव वाढला आहे. यापूर्वीही वादावादीचे प्रकार घडले आहेत. मात्र रविवारी काहींनी वनपालांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. सोमवारी याची सविस्तर माहिती घेऊन कारवाईबाबत निर्णय घेणार आहे.
राष्ट्रीय शिक्षणदिन साजरा
By admin | Updated: November 14, 2016 00:30 IST