तिरोडा : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आधारभूत खरेदी किमतीपेक्षा कमी दराने होत असलेली खरेदी-विक्री याबाबत दैनिक लोकमतमध्ये बातमी प्रकाशित करण्यात आली. ३ मे २०१४ ला धानाची खरेदी आधारभूत खरेदी किमतीपेक्षा कमी दराने धान खरेदी करुन व्यापार्यांनी शेतकर्यांचे शोषण केले. ‘बाजार समितीत शेतकर्यांचे शोषण, आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी’ या शीर्षकाखाली लोकमतला ५ मे रोजी बातमी प्रकाशित करण्यात आली. तर ६ मे रोजी जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीला भेट देवून याबाबत तीन दिवसांत खुलासा मागितला आहे. जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी बाजार समितीला दिलेल्या पत्रात महाराष्टÑ कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास वा विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम ३२ ड, नुसार शासनाकडून निश्चित करण्यात आलेल्या आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत बाजार क्षेत्रामध्ये कृषी उत्पादन खरेदी करण्यास प्रतिबंध करण्याची व्यवस्था करणे आणि विहित करण्यात येईल. अशी उपाययोजना करणे हे पूर्णपणे बाजार समितीचे कर्तव्य असेल, अशी तरतूद आहे. तरी आपले बाजार समितीमध्ये ३ मे रोजी रोजी धान या शेतमालाची आधारभूत खरेदी किंमतीपेक्षा कमी दराने विक्री झालेली असल्याने समितीद्वारे उपरोक्त नमूद केलेल्या कायद्यातील तरतुदींचे पालन का करण्यात आले नाही? तसेच आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत धान खरेदी केलेल्या व्यापार्यावर समितीने काय कारवाई केली? याबाबतचा समितीचा स्वयंस्पष्ट खुलासा कार्यालयास तीन दिवसांच्या आत सादर करावा अन्यथा आपणांवर महाराष्टÑ कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व नियम १९६७ अन्वये कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. अशा स्वरुपाच्या पत्रावर बाजार समिती कोणता खुलासा सादर करते, पत्रानुसार व्यापार्यांवर कोणती कारवाई करते याबाबत शेतकर्यांचे लक्ष लागले आहे. समितीवर व्यापारी, मिलमालक, दलाल व संचालक मंडळाचे वर्चस्व असल्याने याबाबत थातूरमातूर कारवाई केली जाईल, अशा प्रकारची चर्चा आहे. तर असे पत्र कित्येकदा येतात, अशा प्रकारचे मत काही संचालक मंडळांचे आहे, असेही बोलल्या जात आहे.(शहर प्रतिनिधी)
कृउबासला जिल्हा उपनिबंधकांचे पत्र
By admin | Updated: May 11, 2014 00:24 IST