या महिन्यातील दुसरी घटना : परिसरात बिबट्याची दहशतसाखरीटोला : नुकतेच गोठ्यात शिरून बकरी व तिच्या पिलाला ठार केल्यानंतर अता जंगलात चरण्यास गेलेल्या गाईला बिबट्याने ठार केले. शुक्रवारी (दि.२३) सायंकाळी ५ वाजतादरम्यान कारू टोला जंगलात ही घटना घडली. मागील काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा वावर असून त्याचे सतत जनावरांवरील हल्ले सुरू आहेत. मांडोदेवी जंगल परिसरात या बिबट्याने बस्तान मांडले असून खाद्याच्या शोधात तो गावांकडे धाव घेत आहे. यातच त्याने १७ आॅक्टोबर रोजी पानगाव येथील ओमप्रकाश चन्ने यांच्या गोठ्यातील बकरीला ठार केले होते. या घटनांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असतानाच आता बिबट्याने शुक्रवारी सायंकाळी ५ वाजतादरम्यान कारूटोला जंगलात चरण्यास गेलेल्या गाईला ठार करून फस्त केले. ही गाय कारूटोला निवासी ओमराज बोहरे यांची असून त्यांचे १५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. मांडोदेवी जंगल परिसर येरमडा, वडद, कवडी, कारूटोला व तेलीटोला या गावांना लागून आहे. त्यामुळे या बिबट्यापासून या गावातील पाळव प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. तर बिबट नरभक्षी होण्यापूर्वी त्याला वन विभागाने पकडावे अशी मागणी गावकरी करीत आहेत. (वार्ताहर)
बिबट्याने केले गाईला ठार
By admin | Updated: October 26, 2015 01:48 IST